पालघर : कोरोनाचे संक्रमण थोडं कमी झालं आणि सरकारने ताळेबंदी उठवायला सुरुवात केली. त्यामुळे पालघर जिल्ह्यातही कोरोनाचे काहीसे निर्बंध शिथिल केले. परंतु काही नागरिकांना कोरोना उरलाच नाही, असं वाटायला लागलं असून कोरोनाचे सर्व नियम धुडकावून बेजबाबदारपणे पर्यटन स्थळांवर गर्दी करू लागले आहेत.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने आणि पावसाने विश्रांती घेतल्याने पालघर जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळावर नियम धुडकावून पर्यटकांनी गर्दी केली होती. पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून कोरोना आणि पर्यटन स्थळा बाबतीतील निर्बंधात थोडीशी शिथिलता दिली आणि पर्यटकांनी स्वतःच वाट मोकळी केली. जिल्ह्यातील पालघर मनोर रोडवरील वाघोबा खिंड सौंदर्यस्थळ, अशेरी गड, जव्हारचा दाभोसा धबधबा, निकवलीचे सूर्या नदी किनारी असलेले सप्तशृंगी मंदिर त्याचप्रमाणे वाडा तालुक्यातील कोहोज किल्ला, किनारपट्टीवरील बीचेस आणि इतर सर्वच पर्यटन स्थळांवर आणि धोकादायक ठिकाणी पर्यटकांनी मजा लुटण्यासाठी हजेरी लावली होती. यावेळी या पर्यटकांना रोखण्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा दिसत नव्हती. कोहोज किल्ल्यावर तर आलेल्या काही पर्यटकांनी दारू पिऊन धिंगाणा घातला. यावेळी दुसऱ्या पर्यटकांच्या गटाने हा धिंगाणा थांबवण्यासाठी विनंती केली, मात्र या दोन गटांत जोरदार हमरीतुमरी झाली. यावेळी काही स्थानिकांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला. यावेळी कोरोनाचे सर्व नियम या पर्यटकांनी पायदळी तुडवले, साधा मास्कही कुणाच्या तोंडावर दिसत नव्हता.
सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडलेल्या पर्यटकांची गर्दी जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर रविवारी झाली होती. यावेळी कोणतेही कोरोना विषयीचे नियम पाळले जात नव्हते. मात्र प्रशासनाकडून थोडी शिथिलता दिली आणि काही बेजबाबदार नागरिकांना आणि तरुणाईला कोरोनाचे समूळ उच्चाटन झाले. असेच वाटायला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्हा श्रेणी दोनमध्ये असून अजुनही पालघर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून काहींचे कोरोनाने मृत्यूही होत आहेत. त्यामुळे नागरिक जर असेच बेजबाबदारपणे वागू लागले तर पुन्हा कोरोनाने रौद्र रूप धारण केले तर नवल वाटायला नको. त्यामुळे प्रशासनाने या हुल्लडबाज आणि बेजबाबदारपणे वागणाऱ्यावर कारवाई करून त्यांना वेळीच रोखणे आवश्यक आहे. अशी मागणी आत्ता सुज्ञ नागरिक करू लागले आहेत.