करोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा आजपासून पुन्हा सुरु होत आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं आज (४ ऑक्टोबर) विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून जातील. खरंतर, राज्य सरकारने यापूर्वी ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. त्यानंतर, आता मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबईतल्या शाळा सुरु करण्यासही परवानगी दिली आहे. तसेच, पहिल्या दिवशी मुलांच्या स्वागतासाठी शिक्षणोत्सव साजरा करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे.
शाळा सुरु होत असल्या तरीही करोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळला नसल्याने सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे स्पष्ट आदेश शासन-प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे, एका बाकावर एक विद्यार्थी, एक दिवसाआड उपस्थिती, मास्क-सॅनिटायझर या सर्व नियमांचं पालन करुनच शाळा सुरु होणार आहेत. “करोना अजूनही संपला नाही. सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. आता आपणही काळजी घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी करोना नियमांचं काटेकोर पालन करावं”, असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. दरम्यान, शाळा पुन्हा सुरु करताना विद्यार्थी, शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नेमकं कोणत्या-कोणत्या नियमांचं पालन करणं अनिवार्य असणार आहे? जाणून घेऊया.
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. करोनाची लस घेतली नाही म्हणून अनुपस्थित राहण्याची मुभा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नाही. तर महापौर पेडणेकर यांनी सांगितलं की, “मुंबईत शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे. शिक्षकांचं ७० टक्के लसीकरणही झालं आहे. पालिकेच्या १० हजार शिक्षकांपैकी ७ हजार शिक्षकांचं लसीकरण झालं आहे. या सर्वांचा आढावा घेण्यात येणार आहे.”
राज्य सरकारकडून करोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून शाळा पुन्हा कशा सुरु करायच्या याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. स्वतः शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी तज्ज्ञांच्या मदतीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतचं मार्गदर्शन केलं आहे. त्यानुसार त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त यांच्या मान्यतेने राज्यातील जवळपास बहुतांश भागांतील शाळा सुरू होत आहेत.त्याप्रमाणे, आता ग्रामीण भागांत पाचवी ते बारावीचे तर मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरी भागांतील आठवी ते बारावीचे वर्ग भरणार आहेत.
राज्यात रविवारी (३ ऑक्टोबर) दिवसभरात करोनाचे २,६९२ नवे रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत ४१ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात २७१६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.