नागपूर : राज्यात दिवसागणिक करोनाच्या स्थितीत चांगली सुधारणा असून सात जिल्ह्य़ांत केवळ एक आकडी तर १२ जिल्ह्य़ांत दोन आकडी सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील एकूण २९ हजार ७८२ सक्रिय रुग्णांपैकी ८२ टक्के रुग्ण हे केवळ सहा जिल्ह्य़ांत आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम अहवालानुसार, १५ ऑक्टोबरला राज्यात करोनाचे एकूण २९ हजार ७८२ सक्रिय रुग्ण होते. यापैकी ३१ रुग्ण हे इतर राज्ये वा इतर देशांतील आहेत.
जळगाव (१२ रुग्ण), जालना (६० रुग्ण), लातूर (९३ रुग्ण), परभणी (५० रुग्ण), हिंगोली (२२ रुग्ण), नांदेड (१५ रुग्ण), अमरावती (१० रुग्ण), अकोला (२८ रुग्ण), बुलढाणा (१५ रुग्ण), नागपूर (७४ रुग्ण), चंद्रपूर (४२ रुग्ण), गडचिरोली (१५ रुग्ण) या बारा जिल्ह्य़ांत दोन आकडी रुग्ण आहेत. या बारा जिल्ह्य़ांतील रुग्णसंख्या केवळ ४३७ रुग्ण आहे. पालघर (५८५ रुग्ण), रत्नागिरी (३३१ रुग्ण), सिंधुदुर्ग (५९० रुग्ण), सांगली (७५६ रुग्ण), कोल्हापूर (२०८ रुग्ण), सोलापूर (६८८ रुग्ण), नाशिक (६५७ रुग्ण), औरंगाबाद (५४४ रुग्ण), बीड (१७२ रुग्ण), उस्मानाबाद (३५३ रुग्ण) या दहा जिल्ह्य़ांत तीन आकडी रुग्ण आहेत. या दहा जिल्ह्य़ांतील एकूण सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार ८८४ एवढी आहे. या आकडेवारीला आरोग्य विभागाने दुजोरा दिला आहे.
विदर्भातील स्थिती उत्तम
करोनाची सर्वात चांगली स्थिती विदर्भात असून येथे केवळ २०७ सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या राज्यातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत केवळ ०.६९ टक्के आहे. एकूण रुग्णांत अमरावती १०, अकोला २८, वाशिम ५, बुलढाणा १५, यवतमाळ ९, नागपूर ७४, वर्धा ४, भंडारा २, गोंदिया ३, चंद्रपूर ४२, गडचिरोली १५ रुग्णांचा समावेश आहे. नागपुरात ७४ रुग्ण दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात नागपूरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार केवळ २० सक्रिय रुग्णच आहेत.
नक्की कुठे? सर्वाधिक ८ हजार ७९ सक्रिय रुग्ण पुण्यात आहेत. त्यानंतर ६ हजार २५५ रुग्ण मुंबईत आहेत. ३ हजार ८४२ रुग्ण ठाण्यात, ३ हजार ५६७ रुग्ण अहमदनगरमध्ये, १ हजार ४६५ रुग्ण साताऱ्यात, १ हजार १९३ रुग्ण रायगड जिल्ह्य़ात आहेत. या सहा जिल्ह्य़ांतील एकूण रुग्णसंख्या २४ हजार ४०१ एवढी असून ती राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांच्या तुलनेत ८१.९३ टक्के एवढी आहे.
येथे सर्वात कमी.. नंदूरबार (१ रुग्ण), धुळे (६ रुग्ण), वाशिम (५ रुग्ण), यवतमाळ (९ रुग्ण), वर्धा (४ रुग्ण), भंडारा (२ रुग्ण), गोंदिया (३ रुग्ण) या जिल्ह्य़ांत केवळ एक आकडी सक्रिय रुग्ण आहेत. या सात जिल्ह्य़ांतील रुग्णसंख्या केवळ ३० आहे.