District cooperative Bank Election : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून काही जागांवरील निकाल हाती आले आहेत. जळगावमध्ये महाविकास आघाडी सहकार पॅनलने मुसंडी मारली आहे. एकूण २१ पैकी १२ जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार विजयी ठरले आहेत.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 21 जागांपैकी 11 बिनविरोध झाल्या होत्या. रविवारी 11 जागांसाठी 15 मतदान केंद्रावर निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली. बँकेच्या एकूण 2 हजार 853 मतदारांपैकी 2 हजार 684 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात एकूण 94.8 % इतके मतदान झाले आहे.
आज सकाळपासून आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीवर भाजपने बहिष्कार टाकल्यानंतर महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे 11 उमेदवार बिनविरोध झाल्याने दहा जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. तसेच सहकार पॅनल विरुद्ध शेतकरी विकास पॅनल अशी लढत पाहायला मिळाली. मात्र महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे 11 उमेदवार बिनविरोध झाल्याने महाविकास आघाडी सहकार पॅनलचे पारडे जड मानले जात आहे.
धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेच्या चार जागांचे निकाल जाहीर
धुळे जिल्हा बँक निवडणुकीत दहापैकी चार जागांचे निकाल जाहीर झालेत. महाविकास आघाडीच्या किसान संघर्ष पॅनलने दोन तर भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलने दोन जागांवर विजय मिळवला आहे. भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलतर्फे हर्षवर्धन दहिते व राजेंद्र देसले यांचा विजय झाला आहे. तर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनल मधून चंद्रकांत रघुवंशी व संदीप वळवी विजयी झाले आहेत.
मध्यवर्ती बँकेच्या 17 जागांपैकी सात जागा या बिनविरोध झाल्या आहेत. त्यापैकी सहा जागांवर भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनल विजयी झाले असून एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आज निकाल
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत 96 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 21 जागांसाठी ही लढत असताना यातील 11 जागा ह्या बिनविरोध झाल्या. मात्र उर्वरीत दहा जागांसाठी झालेल्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रावर हायहोल्टेज ड्रामा पहायला मिळाला. यात माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या होम पिचवरच त्यांच्या विरोधात त्यांचाच कार्यकर्ता ज्ञानेश्वर रांजने हे निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. या दोघांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याने तणाव निर्माण झाला होता.