करोनामुळे बिघडलेली अर्थव्यवस्था आणि सामान्य जीवन पुन्हा एकदा रुळावर येत असतानाच करोनाच्या नव्या विषाणूने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेला करोनाचा नवा विषाणू ‘ओमिक्रॉन’ डेल्टापेक्षाही जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी यांनीही शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत सतर्कतेचे आदेश दिले. महत्वाचं म्हणजे करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राने पूर्वकाळजी घेत निर्बंध लावले आहेत. मुंबई पालिकेनेही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची माहिती संकलित गोळा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे.
उद्धव ठाकरे यांनी कोविडसंदर्भात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. संध्याकाळी ५.३० वाजता ही बैठक होणार आहे.
यापुढे मुखपट्टी ही बंधनकारकच असेल. मुखपट्टीशिवाय कोठेही फिरता येणार नाही. मुखपट्टी न वापरणारे पोलीस समोर आल्यास तोंडाला रुमाल गुंडाळतात हे अनुभवास आल्याने यापुढे मुखपट्टीच आवश्यक असेल. तोंडाला रुमाल गुंडाळल्यास ५०० रुपये दंड आकारला जाईल. करोना प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे.
करोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासनदेखील सतर्क झाले आहे. मुंबईत येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची मागील पंधरा दिवसांच्या प्रवासाची आवश्यक माहिती संकलित करावी, असे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी स्वयंघोषणा पत्र देऊन मागील पंधरा दिवसांतील आपल्या प्रवासाची माहिती द्यावी, तसेच त्यांचे पारपत्र (पासपोर्ट) विमानतळ अधिकाऱ्यांनी बारकाईने तपासावेत. प्रचलित पद्धतीनुसार या सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि चाचणी तसेच अलगीकरण काटेकोरपणे करावे असे निर्देश चहल यांनी संबंधित प्राधिकरणाला दिले.