नवी दिल्ली : 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) भाजपविरोधी (BJP) मोट बांधण्याच्या दृष्टीने तिसरी आघाडी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र ही तिसरी आघाडी काँग्रेससह असेल की काँग्रेसला त्यात स्थान नसेल याबाबत अनेक मतमतांतरं येत आहेत. अशात काँग्रेस खासदार कुमार केतकर (Kumar Ketkar) यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. कुमार केतकर यांनी म्हटलं आहे की, तिसरी आघाडी कोणाच्याही नेतृत्वात होऊ शकते. ममतांना तसं वाटत असेल तर त्यांनी प्रयत्न जरूर करावा. काँग्रेस एकला चलो रे सुद्धा तयार आहे, असं ते म्हणाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावर ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांच्याशी एबीपी माझानं एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला.
केतकर म्हणाले की, आम्ही तृणमूलला सोबत बोलवणार आहोत. पण ते आले, नाही आले तरी फरक पडत नाही. कधीकधी एनसीपीही आलेलं नाही, कधी कधी बीजेडी आलेलं नाही कधी सपा नाही. काँग्रेसनं कधीच मागणी केली नाही की नेतृत्व आम्हीच करणार आहोत. काँग्रेसला डॅमेज करण्याचा प्रयत्न आहे पण काँग्रेसला डॅमेज होत आहे की नाही हे पाच राज्यांच्या निकालानंतर कळेल, असंही केतकर म्हणाले.
केतकर यांनी म्हटलं की, तृणमूलला फक्त एवढंच दाखवायचे आहे की ते स्थानिक, प्रादेशिक पक्ष नाहीत. असा प्रयत्न राष्ट्रवादीने पण करून पाहिला होता. काही लोक त्यांना महाराष्ट्रात पुरते आणि काही तर पश्चिम महाराष्ट्र पुरते म्हणत होते मग त्यांनी गुजरात आणि इतर ठिकाणी अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला. या प्रादेशिक पक्षांना आपलं अस्तित्व दाखवण्याचा अधिकार आहे. पण त्यामुळे काँग्रेसला डॅमेज होईल की नाही हा प्रश्न आहे, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, काँग्रेस शिवाय तिसरी आघाडी शक्य नाही. उद्या परिस्थिती बदलली आणि त्यांना लक्षात आलं की काँग्रेस खूप क्षीण झाली आहे तर ते काँग्रेसशिवाय दुसरी आघाडी करतीलही. हे सगळे पक्ष अँटीकाँग्रेस वातावरणात वाढलेले आहेत. या पक्षांना केंद्रातल्या सत्तेला धरून राहावं असं वाटत असते, त्यामुळे यातले अनेक जण तृणमूल, डीएमके, याआधी भाजपसोबत सुद्धा सत्तेत राहिलेले आहेत, असंही ते म्हणाले.