गेल्या साधारण दीड वर्षांपासून जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूपासून सुटका मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहेत. भारतातही या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग घेतला आहे. तर महाराष्ट्राने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा मोठा टप्पा आता गाठला आहे.
महाराष्ट्राने १२ कोटी लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा टप्पा पार करत मोठा विक्रम केला आहे. ७ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात एकूण १२ कोटी ३ लाख १८ हजार २४० लाभार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. यापैकी ७ कोटी ६५ लाख ७१ हजार ७२८ जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर, ४ कोटी ३७ लाख ४६ हजार ५१२ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. ७ डिसेंबर रोजी राज्यात ८ लाख ३० हजार ७६६ लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात आलं.
“राज्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीचे बारा कोटी मात्रा देण्याचा टप्पा आज पार करण्यात यश आले. राज्याने १० कोटींचा टप्पा नऊ नोव्हेंबरला तर अकरा कोटींचा टप्पा २५ नोव्हेंबर रोजी पार केला होता,” अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिली.
राज्यातील करोनाची आकडेवारी..
राज्यात ओमायक्रॉनच्या संसर्गाचा एकही नवा रुग्ण मंगळवारी आढळून आला नाही. त्यामुळे ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या सध्या १० आहे. राज्यात दिवसभरात ६९९ नव्या रुग्णांचे निदान झाले असून १९ मृत्यू झाले. उल्हासनगर, भिवंडी महापालिका क्षेत्रात मंगळवारी एकही नवा करोना रुग्ण आढळून आला नाही.राज्यात दिवसभरात १०८७ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ६,४४५ इतकी झाली आहे.