राज्यात करोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले असताना रुग्णवाढ सुरूच आह़े राज्यात रविवारी करोनाचे १६४८ रुग्ण आढळले असून, आणखी ३१ जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाल़े. याचदरम्यान सांगलीतून एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या महिला वसतीगृहातील ३२ विद्यार्थिनींना करोनाची लागण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसतीगृहातील एका मुलीने त्रास होऊ लागल्यानंतर चाचणी करुन घेतली. यावेळी तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या मुलींची तपासणी केली असता सोमवारी रात्री अहवाल प्राप्त झाला. या चाचणी अहवालानुसार ११ मुली बाधित आहेत.
मंगळवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार, ३२ मुलींना करोनाची लागण झाली आहे. मात्र डीन डॉक्टर सुधीर नणंदकर यांनी अद्याप अहवाल आला नसल्याचे सांगत ११ पॉझिटिव्ह असल्याचं म्हटलं आहे.
राज्यात करोनाबाधितांचा आलेख गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. काही दिवसांपर्यंत दैनंदिन रुग्णसंख्या सातशे ते आठशेपर्यंत नोंदवली जात असताना आता दुप्पट रुग्ण नोंद होऊ लागली आह़े, त्यामुळे करोनाबाधितांची वाढती संख्या ही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या आठवडाभरापासून वाढ होत आहे. शनिवारच्या १४८५ रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन रविवारी १६४८ नवीन बाधितांची नोंद झाली. मुंबईत सर्वाधिक ८९६, पुणे महापालिका१३८, ठाण्यात ६७, तर नवी मुंबईत ६६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, राज्यात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ९ हजार ८१३ झाली आहे.
राज्यात ओमायक्रॉनचे ३१ नवे रुग्ण आढळून आले असून त्यातील २७ रुग्ण मुंबईतील, तर दोन ठाणे आणि पुणे ग्रामीण व अकोला येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या आता १४१ वर पोहोचली असून ६१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. नव्या रुग्णांपैकी ३० जण परदेश प्रवास करून आलेले असून २९ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत, दोन जणांना सौम्य लक्षणे आहेत.