मुंबई : राज्यात करोनाबाधितांची संख्या पुन्हा वेगाने वाढू लागल्याने चिंता व्यक्त होऊ लागली असून रुग्णवाढीचा दर असाच वाढत राहिल्यास जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ात परिस्थिती गंभीर स्वरूप धारण करू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी संध्याकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत चौपाटय़ांसह अन्य सार्वजनिक स्थळी जाण्यास बंदी घातली आहे.
राज्यात दिवसभरात करोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली. ८,०६७ नव्या रुग्णांचे निदान झाले असून, ओमायक्रॉनचे चार नवे रुग्ण आढळले. तर गेल्या २४ तासांत आठ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढली आहे. सध्या २४,५०९ रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वाधिक म्हणजे १६,४४१ उपचाराधीन रुग्ण मुंबईत आहेत.
राज्यात ओमायक्रॉनचे चार रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ओमायक्रॉन रुग्णांची आतापर्यंतची संख्या ४५४ झाली आहे. मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ झाली, तर २४ तासांत एकच रुग्ण दगावल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
दिवसभरात ८,०६७ नवे रुग्ण
मुंबई, ठाण्यासह पुणे, नागपूर, सातारा, नाशिकमध्ये २४ तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली. नाशिक जिल्हा १२४, पुणे शहर ४२०, उर्वरित पुणे जिल्हा १२२, पिंपरी-चिंचवड १३९, सातारा ४६, मराठवाडा ७३, नागपूर जिल्हा ९१ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात ओमायक्रॉनचे चार रुग्ण आढळले. नवी मुंबई, वसई-विरार, मीरा भाईंदर आणि पनवेल येथील प्रत्येकी एकाचा त्यात समावेश आहे. राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची आतापर्यंतची संख्या ४५४ झाली आहे.
इशारा काय..?
गेल्या तीन-चार दिवसांतील रुग्णवाढीचा दर लक्षात घेतल्यास आणि अशीच परिस्थिती राहिल्यास जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ात स्थिती गंभीर बनू शकते. त्यावेळी दोन लाखांपेक्षा अधिक रुग्ण उपचाराधीन असतील. त्यामुळे आतापासूनच रुग्णालयांमधील खाटा आणि प्राणवायूची उपलब्धतता याबरोबरच अन्य सज्जता ठेवण्याच्या सूचना अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी दिल्या.