पुणे : करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन या विषाणूचा वेगाने प्रसार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून सुरू होत आहे. मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येणार असून, राज्यातील ६५० केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
मुलांच्या लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नावनोंदणी शनिवारपासून (१ जानेवारी) सुरू करण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. २००७ मध्ये किंवा त्यापूर्वी जन्मलेली सर्व मुले करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पात्र आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई म्हणाले, राज्यात १५-१८ वर्ष वयोगटातील सुमारे साठ लाखांवर मुले करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पात्र आहेत. राज्यभरातील ६५० केंद्रांवर या वयोगटाचे लसीकरण होणार आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन लशीच्या वापराला परवानगी असल्याने मुलांसाठीच्या लसीकरण केंद्रांवर केवळ कोव्हॅक्सिन लसच उपलब्ध असेल याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करणे शक्य नसलेल्या ठिकाणी लसीकरण केंद्रांवर मुलांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी असेही सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना कळवल्याचे डॉ. देसाई यांनी स्पष्ट केले.
‘स्वतंत्र केंद्रे सुरू करा’
नवी दिल्ली : पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी शक्य असल्यास स्वतंत्र केंद्रे सुरू करा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी रविवारी राज्यांना केली़ मुलांना फक्त कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आह़े अठरा वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिन आणि कोव्हीशिल्ड या दोन्ही लशी देण्यात येत असल्याने लशींबाबत गोंधळ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचनाही मंडाविया यांनी राज्यांना केली़
‘लशीची भीती नको’
कोव्हॅक्सिन ही सर्वात सुरक्षित लस असल्याने पालकांनी अजिबात घाबरून न जाता मुलांचे लसीकरण करावे, असा सल्ला ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद आगरखेडकर यांनी दिला़ लस टोचल्यानंतर टोचलेली जागा लाल होणे, दुखणे किंवा ताप येणे हे सर्वसामान्य परिणाम दिसल्यास घाबरून जाऊ नये. अर्धा तास लसीकरण केंद्रावर थांबावे. त्यानंतर घरी जावे. मात्र, मुलांना लस देण्याबाबत टाळाटाळ किंवा दिरंगाई करू नये, असेही डॉ. आगरखेडकर यांनी स्पष्ट केले.
१२ हजार नवे रुग्ण
मुंबई : राज्यातील करोना रुग्णवाढीचा दर झपाटय़ाने वाढत असून, गेल्या २४ तासांत सुमारे १२ हजार नव्या रुग्णांचे निदान झाले. यापैकी सुमारे आठ हजार मुंबई शहरातील आहेत. ओमायक्रॉनचा ५० जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून, यापैकी ४६ जण पुणे जिल्ह्यातील आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ११,८७७ नव्या रुग्णांचे निदान झाले. ठाणे जिल्ह्यात दिवसभरात १७०० रुग्ण आढळल़े
मुंबईत नऊ केंद्रे
मुंबई : किशोरवयीन मुलांच्या लसीकरणासाठी मुंबईत नऊ केंद्रे निश्चीत करण्यात आली आहेत़ या केंद्रांवर महानगरपालिकेच्या शाळांमधील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसह इतरही मुलांना मोफत लस देण्यात येणार आहे. प्रतिसाद पाहून या लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केल़े
महाविद्यालयांबाबत दोन दिवसांत निर्णय
मुंबई : राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कुलगुरूंबरोबर बैठक झाली आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून महाविद्यालये सुरू ठेवण्याबाबत पुढील निर्णय दोन दिवसांत घेण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी सांगितले. पान ५
रुग्णवाढ अशी..
२८ डिसेंबर : २,१७२
२९ डिसेंबर : ३९००
३० डिसेंबर : ५,३६८
३१ डिसेंबर : ८०६७
१ जानेवारी : ९,१७०
२ जानेवारी : १२ हजार