मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना कोरोनाची लागण होत आहे. यातच आता कोरोनाचा शिरकाव केंद्रीय मंत्रिमंडळात झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. खासदार हेमंत गोडसे यांनाही अलीकडचे कोरोनाची लागण झाली होती.
दोन दिवस नाशिक-मुंबई दौरा झाल्यानंतर डॉ. भारती पवार यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉ. भारती पवार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. खासदार हेमंत गोडसे आणि भारती पवार दोन दिवसांच्या नाशिक-मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यानंतर खासदार गोडसे यांचा अहवाल प्रथम पॉझिटिव्ह आला. त्यानंतर डॉ. भारती पवार यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
राज्यातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राजकीय नेतेमंडळींभोवतीही कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील १२ मंत्र्यांसह विविध पक्षांतील जवळपास ७० आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता टेन्शन वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. २४ तासांत ९० हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात तब्बल ५६ टक्क्यांनी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी देशात २४ तासांत कोरोनाचे ९०,९२८ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर ३२५ लोकांचा मृत्यू झाला आहे.