शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर 96 वर्षांचे असते. 23 जानेवारी या त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण असे. बाळासाहेब हे झुंजार होते. रसिक होते. मुख्य म्हणजे ते एका मोठ्या लोकयुद्धाचे सेनापती होते अशा शब्दांत शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आठवण काढली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनामधून त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
“बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ते 96 वर्षांचे असते. योद्ध्याचे वय मोजायचे नसते. मृत्यूनंतरही तो जिवंतच असतो व लढण्याची प्रेरणा देत असतो. बाळासाहेब ठाकरे हे त्या अर्थाने कधीच म्हातारे झाले नाहीत. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांचे वाढदिवस जोरात साजरे झाले, पण वय मोजलेले त्यांना आवडत नसे. बाळासाहेब म्हणजे राजकारणातला एक मनोवेधक विषय ठरला. त्यांचे आयुष्य म्हणजे कृतींनी गजबजलेले मनोहारी नाट्यच होते. त्या नाट्यास बहुरंगी छटा होत्या. महाराष्ट्रात आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. या स्थितीत बाळासाहेब ठाकरे ‘मातोश्री’वर असते तर त्यांची काय भूमिका असती, असा मिश्कील प्रश्न अनेकांना पडल्याशिवाय राहात नाही. विशेषतः महाराष्ट्रातील भाजपच्या बेताल माकडचेष्टा पाहून बाळासाहेबांनी कोणत्या मार्मिक टिपण्या केल्या असत्या? त्यांच्या मनात व्यंगचित्रांच्या कोणत्या रेषा उमटल्या असत्या?,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“बाळासाहेब हे व्यंगचित्रकार होते. त्यांनी कुंचल्यांचे फटकारे मारायला सुरू केले तेव्हा पंडित नेहरू, गुलझारीलाल नंदांपासून स. का. पाटील, मोरारजी देसाई, इंदिरा गांधी असे लोक राजकारणात होते. जगजीवनराम, इंदिरा गांधी, मोरारजींवर व्यंगचित्रकार म्हणून त्यांचा विशेष लोभ होता. बाळासाहेबांनी व्यंगचित्र काढणे सोडले तेव्हा ते म्हणाले, “मी फटकारे मारावेत अशी मॉडेल्स आता राहिली नाहीत.’’ पण अचानक राजकारणात नरसिंह राव, सीताराम केसरी, सोनिया गांधींचा उदय झाला तेव्हा ते हळहळले. ‘‘मी कुंचला खाली ठेवल्यावर ही ‘मॉडेल्स’ आली. यांच्यावर व्यंगचित्रे काढताना मजा आली असती.’’ अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी बाळासाहेब व्यंगचित्रकार म्हणून काय विचार करतात हे पाहायला धम्माल आली असती. आज राजकारणात व्यंगबहार सुरू असताना बाळासाहेब आपल्यात नाहीत,” अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केली आहे.
“बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. एकाच वेळी त्यांनी मराठी अस्मिता व हिंदुत्व या घोड्यांच्या रथावरून देशाच्या राजकारणात भरधाव प्रवास केला, पण त्यांचे व्यक्तिमत्त्व पारदर्शक होते. अन्यायाची चीड व त्याचा प्रतिकार करण्याची वृत्ती त्यांच्याकडे उपजत होती. मराठी माणसांवरील अन्यायाच्या चिडीतून त्यांनी शिवसेनेची ठिणगी टाकली व बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय प्रवास सुरू झाला, तो हिंदुत्वाच्या लाटेवर उसळत पुढे जात राहिला. बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या मनावर राज्य केले. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईसाठी मराठी माणसाने 105 हुतात्मे दिले, पण मुंबईत मराठी माणसाला स्थान राहिले नाही. त्याचा अपमान, अवहेलना सुरू झाली. नोकरी, व्यवसायात त्याला डावलण्यात आले. तेव्हा ‘मार्मिक’मधून लेखणी, कुंचल्याच्या फटकाऱ्याने त्यांनी मराठी लोकांत आगीचा वणवा पेटवला. त्या आगीच्या लोळातून शिवसेना उभी राहिली. त्याच शिवसेनेचे नेतृत्व बाळासाहेब करू लागले. बाळासाहेब तेव्हा काय म्हणाले? बाळासाहेबांनी मराठी स्वाभिमानाची भाषा केली, पण इतर भाषिकांचा अनादर केला नाही. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला तरी इतर धर्मीयांना कमी लेखले नाही. मला हिंदूंचा खोमेनी व्हायचे नाही, पण बहुसंख्य हिंदूंच्या भावना लाथाडून यापुढे देशात कुणालाच राजकारण करता येणार नाही, असे ते ठणकावून सांगू लागले. देश तोडणारे खलिस्तानवादी असोत किंवा पाकधार्जिण्या मुस्लिम अतिरेकी संघटना, बाळासाहेब जाहीर सभांतून त्यांना आव्हान देत राहिले. त्यामुळे पाकिस्तानसारख्या दुष्मन राष्ट्रात बाळासाहेबांच्या नावाचा प्रचंड धसका घेण्यात आला होता. बाळासाहेब परखडपणे म्हणाले होते की, ‘‘आमचे मुसलमानांशी वैर नाहीच. त्यांनी पाकिस्तानकडे तोंड करून बांग देऊ नये. ‘वंदे मातरम्’चा आदर करावा, समान नागरी कायद्याचा आदर करावा.’’ इतक्या सोप्या पद्धतीने ते मांडणी करत व लोकांत एका राष्ट्रवादी विचारांचे बीज पेरत ते पुढे जात. आज हिंदुत्वाच्या नावाने जे थोतांड चालले आहे, कोणी काय खायचे यावरून रस्त्यावर मुडदे पाडले जात आहेत. गंगेतील एका डुबकीसाठी सरकारी तिजोरीतले सहा-सात कोटी खर्च केले जातात. दलितांच्या घरी जेवणावळी करून आपण स्वच्छ मनाचे हिंदू असल्याचे सांगावे लागते. पण ज्याच्या घरी जेवतो त्याच्या अंगास दुर्गंधी सुटली होती असे सांगून त्या अन्नाचा आणि अन्नदात्याचाही अपमान करायचा. अशा ढोंगी हिंदुत्वाचा पुरस्कारही बाळासाहेबांनी केला नाही,” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
“बाळासाहेब हिटलरला मानत, पण ते त्याच्यासारखे हुकूमशहा होते काय? हिटलर साम्राज्यवादी होता. त्याला जग जिंकून राज्य करायचे होते. जगाने आपल्या पायाशी लोळण घ्यावी यासाठी त्याने जगावर महायुद्ध लादले. लाखो लोकांचे प्राण घेतले. देश बेचिराख केले. ज्यूंच्या कत्तली घडवल्या व स्वतःबरोबर त्याने जर्मनीचा विनाश घडवून आत्महत्या केली. बाळासाहेब हे तशा विचारांचे हुकूमशहा नव्हते. शिवसेनेसारख्या बलाढ्य संघटनेचे ते सूत्रधार होते व त्यांच्या एका शब्दाखातर प्राण देणारे शिवसैनिक त्यांच्या आसपास होते. या शक्तीचा त्यांनी गैरवापर केला नाही. या शक्तीचा वापर त्यांनी लोकांना न्याय देण्यासाठी व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी केला. या शक्तीमुळे बाळासाहेब ठाकरे हे एक स्वतंत्र न्यायालय बनले व या न्यायालयात त्यांचा शब्द प्रमाण ठरू लागला. त्यांच्या न्यायालयात देशातली शक्तिमान माणसे, सरकारी पदावरील व्यक्ती येत व निवाडा मान्य करून जात. उद्योगपती, गुन्हेगारी जगत, प्रशासन, सिनेसृष्टी अशा क्षेत्रांत ‘ठाकरे’ सरकारच्या शब्दाला कमालीचे वजन होते. म्हणून ते हुकूमशहा होते असे म्हणता येणार नाही,” असं त्यांनी सांगितलं आहे.
‘सामान्य आणि सन्मान्य’ अशा परस्पर विरोधांनी बाळासाहेबांचा जीवनपट तयार झालेला आहे. ‘डिक्टेटर ऍण्ड डेमॉक्रॅट’ हे शब्द त्यांच्या बाबतीत योग्य ठरतात. कोणताही हुकूमशहा हा आता लोकशाहीचा मुखवटा लावूनच वावरत असतो. लोकशाही मार्गाने तो सत्तेवर येतो व त्याच लोकशाहीचा आणि देशाचा मालक बनण्याचा प्रयत्न करतो. विरोध करणाऱ्यांना खतम करतो. बाळासाहेब ठाकरे हे ढोंग करीत नव्हते. ते स्वतः कधीच निवडणूक लढले नाहीत. पण शिवसेनेला निवडणुकीच्या मैदानात उतरविले. निवडणुकांत ते कधी हरले तर कधी जिंकले. ते महाराष्ट्राच्या सत्तेवर आले, तसे सत्तेबाहेरही गेले. लोकशाही मार्गाने झालेला पराभव त्यांनी स्वीकारला आहे. त्यांनी रस्त्यावरचे ‘राडे’ करायला अनुयायांना परवानगी दिली. बंद पुकारले, संघर्ष केला. लोकशाही मार्गाने मिळालेली निषेधाची सर्व हत्यारे वापरली, ते हुकूमशहा असते तर हा मार्ग स्वीकारला नसता. त्यांनी न्यायालयातील भ्रष्टाचारावर टीका केली व एक आरोपी म्हणून न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभेदेखील राहिले. ते उदार होते तसेच तिखटही होते. ते शांततेचे उद्गाते होते तसे लोकयुद्धाचे सेनापती होते. ते झुंजार होते आणि रसिकही होते. भावना व बुद्धी, साहस व सावधगिरी, नम्रता व फटकळपणा हे परस्परविरोध त्यांच्या व्यक्तित्वात, वागण्यात आणि बोलण्यात एकत्र गुण्यागोविंदाने नांदत होते असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
“बाळासाहेब ठाकरे आज शिवतीर्थावर विसावले आहेत. 23 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस. त्यांच्या हयातीत हा दिवस आनंदाचा उत्सव ठरत असे. संध्याकाळच्या सभेत ते भाषणाला उभे राहात. व्यासपीठावर त्यांचा स्वभाव गंभीर व उग्र वाटे (प्रत्यक्षात ते तसे नव्हते). त्यांच्या शुभ्र कपड्यांत, खांद्यावरील शालीत साधेपणा होता, तितकाच रुबाब होता. महाराष्ट्रासाठी आणि राष्ट्रासाठी त्यांनी काय केले, काय सोसले हे रोज सांगण्याची गरज नाही. ‘ठाकरे’ या नावातच त्यांचा त्याग व संघर्ष सामावलेला आहे. आज देशातील अनेक नेत्यांकडे, राजकारण्यांकडे पाहतो तेव्हा वाटते, महाराष्ट्रात काय, तर देशातही बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठा पुरुष निर्माण व्हायचा आहे,” असं संजय राऊत म्हणतात.