मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमधील शाळा सोमवारपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र, नियमांबाबत विसंगती असून, शाळाही संभ्रमात आहेत. एखाद्या विद्यार्थ्यांला करोनाची लागण झाल्यास केवळ शेजारच्या मुलांचे विलगीकरण करावे, असे शिक्षण विभागाच्या शासन निर्णयातील नियमावलीत नमूद असताना करोनाबाधित आढळल्यास संपूर्ण वर्ग बंद करावा, अशी सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी केली.
दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचं बंधन नसल्याचं राज्याचे पर्यावरणंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. पालकांना मुलांना शाळेत पाठवणं जोखमीचं वाटत असेल तर त्यांनी पाठवू नये असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. मुलांनी आणि पालकांनी याबाबत मिळून निर्णय घ्यायचा आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.
भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी यावरुन टीका केली असून राज्यात प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो असा टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधताना दिल्ली काबीज करण्यासंबंधी केलेल्या वक्तव्याचाही आधार घेतला.
अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “शाळा सुरू ही करायच्या आणि मुलांना उपस्थितीचे बंधन नाही असे परस्पर विरोधी विधान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी करायचे. महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि मुख्यमंत्री घरात बसून दिल्लीवर स्वारी करणार आहेत”.
’शाळा सुरू करण्यास शासनाने संमती दिली असली तरी स्थानिक प्रशासनाला त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार मुंबई, ठाणे, नाशिक, लातूर, वर्धा, नांदेड येथील पहिलीपासूनचे सर्व वर्ग सोमवारपासून भरणार आहेत.
’पुण्यातील शाळांबाबत पुढील आठवडय़ात निर्णय घेण्यात येणार आहे. जळगाव येथील ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार आहेत, तर औरंगाबाद येथे फक्त दहावी आणि बारावीचे वर्ग भरणार आहेत.
’नागपूर, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नगर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. पालघर, धुळे येथील आठवी ते बारावीचे वर्ग भरणार आहेत. कोल्हापूर येथील शाळा मंगळवारपासून सुरु होणार आहेत.
हा देश आपल्या अधिपत्याखाली हवा, या भूमिकेतून केंद्रातील सत्ता गाजवली जात असून, आज आपण गप्प बसलो तर देश म्हणून गुलामगिरीत जाऊ, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपची ही आणीबाणी मोडून काढायची तर दिल्लीत शिवसेनेसारखा पक्ष हवा. त्यासाठी इतर राज्यांतही शिवसेना वाढवण्यासह महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकण्याच्या जिद्दीनेच लढूया, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केला.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत आदी यावेळी उपस्थित होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रास्ताविक केले. ‘‘दिल्ली काबीज करण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणार की नाही? ते पूर्ण करणार नसू तर या सगळय़ाला अर्थ नाही’’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. बाबरी मशीद पडली त्याचवेळी देशभरात शिवसेनेच्या हिंदूुत्वाची लाट होती. त्याचवेळी देशभरात पक्ष वाढवला असता तर शिवसेनेचा पंतप्रधान असता, असे विधानही ठाकरे यांनी केले.