कोल्हापूरमध्ये बिटकॉइन या आभासी चलनामध्ये गुंतवणूक करायला सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी केदार नारायण रानडे या आरोपीविरुद्ध २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा रविवारी (२३ जानेवारी) दाखल झाला आहे. यापूर्वी रानडे याच्यासह ६ जणांच्या विरोधामध्ये गेल्या महिन्यामध्ये ५८ लाख रुपये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
आरोपी रानडे आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी कोल्हापुरातील ताराबाई पार्कमध्ये कार्यालय सुरू केले होते. त्यांनी आभासी चलन गुंतवणूक केल्यास १८० टक्के परतावा देण्याची स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात केली होती. त्यावर विसंबून राहून काहींनी गुंतवणूक केली, पण तीन वर्षात परतावा न मिळाल्याने रानडे याच्यासह इतर आरोपींविरोधात ५८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा गेल्या महिन्यात दाखल झाला होता.
आज पुन्हा एक गुन्हा दाखल झालाय. सुहास नागनावार यांची अशाचप्रकारे गुंतवणुकीतून परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक झालीय. जुलै २०१७ ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत नागनावार यांची रानडे याच्यासह दोघांनी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा राजाराम पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहेत. पोलिसांनी रानडे याचा गोवा येथील साथीदार अजय दोडमनी, सुकांता भौतिक यांचा शोध सुरू ठेवला आहे. यापूर्वी पद्मनाभ ऊर्फ पॅडी वैद्य (पुणे), अमित बीर, कंपनी मालक नवीन पाठक, अमित भारद्वाज, अजय भारद्वाज ( रा. सर्व नवी दिल्ली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.