ऑक्टोबर महिन्यापासून अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या वेशीवर असलेल्या जंगल परिसरात आणि अनेकदा मानवी वस्तीत शिरणारा बिबट्या अखेर जुन्नर वनपरिक्षेत्रात परतला आहे. ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा या बिबट्याने कल्याण तालुक्यातील एका वस्तीवर पाळीव प्राण्यांची शिकार केली होती. त्यानंतर सलग तीन महिने तो विविध ठिकाणी दिसून आला. जुन्नर वनपरिक्षेत्रातील अभ्यासकांनी या बिबट्याला रेडिओ कॉलर लावली आहे. त्यामुळे त्याच्या ठावठिकाणा कळत होता. नुकताच या बिबट्याने जुन्नर वनपरिक्षेत्रात प्रवेश केल्याची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण या तालुक्यातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
अंबरनाथ तालुक्याच्या वेशीवर असलेल्या तीन झाडी परिसरातील जंगलात चरण्यासाठी गेलेल्या एका वासराची शिकार या बिबट्याने केली होती. त्यानंतर कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील जांभूळ, वसत, शेलवली, भिसोळ या गावांच्या वेशीवर आणि जंगल क्षेत्राच्या जवळ असलेल्या वस्त्यांमध्ये बिबट्याने पाळीव प्राण्यांची शिकार केली. त्यामुळे अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील या गावांमधील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. ग्रामीण भागात फेरफटका मारणाऱ्या या बिबट्याने काही दिवसांपूर्वी अंबरनाथ शहरात असलेल्या आयुध निर्माण संस्थेच्या परिसरातही फेरफटका मारला होता. येथे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. यासोबतच अंबरनाथ जवळच्या जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात, कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर रायते या भागात तर बदलापूर शहराच्या मांजर्लि परिसरापर्यंत या बिबट्याने फेरफटका मारला होता.
काही दिवसांपूर्वी उल्हासनगर शहराजवळ असलेल्या सोंग्याची वाडी परिसरातही बिबट्याला पाहिल्याचे स्थानिकांनी सांगितले होते. त्यामुळे या सर्व भागांमध्ये त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्याची ठोस माहिती मिळत नसल्याने वनविभागाचे स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी संभ्रमात होते. पशुधनाची होणारी शिकार आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण यामुळे जांभूळ, वसत, शेलवली या ग्रामपंचायतींनी ग्रामसभेमध्ये ठराव करत या बिबट्याला संरक्षित वनक्षेत्रातील स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. त्यावर वनविभागाकडून प्रक्रियाही सुरू होती.
मात्र १३ जानेवारी नंतर या बिबट्याचा कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील वावर कमी झाल्याचे जाणवू लागले. या बिबट्याने बारावी जंगल परिसरात प्रवेश केला असावा अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता १४ जानेवारी नंतर या बिबट्याने जुन्नर वनपरिक्षेत्रात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. ‘वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे संशोधक डॉ. बिलाल हबीब यांनीही या बिबट्याच्या जुन्नर वनक्षेत्रात प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जुन्नर वनक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी या बिबट्याला रेडिओ कॉलर बसवली होती. त्याच्या हालचाली आणि प्रवासाचा अभ्यास करण्यासाठीचा हा प्रयोग होता. त्यामुळे या बिबट्याची हालचालीची दर दोन तासांची माहिती जुन्नर वन क्षेत्रातील अधिकाऱ्यांना मिळत होती. हा बिबट्या जुन्नर वनपरिक्षेत्रात गेल्याने अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
असा होता बिबट्याचा प्रवाससप्टेंबर महिन्यात जुन्नर वनक्षेत्रात रेडिओ कॉलर लावून सोडण्यात आलेल्या बिबट्याने गेल्या तीन महिन्यात सुमारे १८० किलोमीटरचा प्रवास केला आहे. २० ऑक्टोबर २०२१ ते १४ जानेवारी २०२२ या काळात उल्हासनगर ते बदलापूर या वनक्षेत्राच्या ५८ चौरस किलोमीटर परिसरात बिबट्याने वास्तव्य केले. या बिबट्याच्या हालचालींचा अभ्यास रेडिओ कॉलरच्या माध्यमातून केला जात होता. या त्याच्या १८० किलोमीटरच्या प्रवासात त्याने काळू, उल्हास या नद्या अनेकदा ओलांडल्या. तर कल्याण – अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग आणि टिटवाळा भागातून जाणारा रेल्वे रूळही या बिबट्याने ओलांडल्याचे या अभ्यासात समोर आले आहे. त्याच्या या वावरामुळे अनेक निदर्शने समोर आल्याची माहिती वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संशोधक डॉ. बिलाल हबीब यांनी दिली आहे.