औरंगाबादः नथुराम गोडसेच्या (Nathuram Godse) जीवनातील प्रसंगांवर आधारीत Why I Killed Gandhi या चित्रपटाच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसतेय. या चित्रपटाला सेंसॉर बोर्डाने मंजुरी दिलेली नाही, त्यामुळे हा चित्रपट ओटीटीवर रिलीज केला जाऊ नये, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High court) औरंगाबाद खंडपीठातही (Aurangabad bench) या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या चित्रपटातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवण्यात आले असून चित्रपटाच्या प्रसारणाची परवानगी रद्द करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ विष्णू ढोबळे यांनी ही रीट याचिका दाखल केली आहे.
याचिका कर्ते आणि ज्येष्ठ विधिज्ञ विष्णू ढोबळे यांनी 39 पानांची याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मुहूर्त 30 जानेवारी असा ठरवण्यात आला आहे. 1948 साली याच दिवशी महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. चित्रपटाचा दीड मिनिटाचा टीझर राइट इमेज इंटरनॅशनल या निर्मात्या कंपनीने सोशल मीडियावर टाकला आहे. त्यात चित्रपटाच्या अभिनेत्याची काही वाक्ये आहेत. याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती अॅड ढोबळे यांनी केली आहे.
याचिकाकर्ते अॅड. विष्णू ढोबळे म्हणाले, घटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. परंतु ते अमर्याद नाही. ज्या राष्ट्रपित्याने भारतीय स्वातंत्र्य चळवळीलाच नव्हे तर अवघ्या जगाला दिशा दाखवली आहे. त्याच्या कार्यावर टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे, परंतु त्याची मानहानी होईल, अशा स्वरुपात चिखलफेक करण्याचा कोणालाही अधिकार नाही. या चित्रपटाची दीड मिनिटाची क्लिप प्रक्षोभक आहे, असे याचिकेत म्हटले आहे.