राज्य सरकारने द्राक्षे बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना मिळावी, यासाठी मोठी किराणा दुकाने अथवा सुपरमार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइनविक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. हा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्यावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद सुरू झाला आहे. भाजपानं या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली असताना आता राज्य सरकारकडून देखील जोरकसपणे बाजू मांडली जात आहे. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
“आम्ही कुणाला वाईन प्या, असे म्हणू शकत नाही आणि म्हणणार देखील नाही. कारण मद्यपान करू नये, हाच महत्वाचा विषय आहे. सिगारेटवरही धोक्याची सूचना लिहिलेली असतेच, तरीही जगामध्ये अशा गोष्टी सूचना देऊन विकल्या जातात. मद्यपान हानिकारक आहेच, त्याविषयीची जागृती आपण करत असतो. वाईन उद्योगाला द्राक्ष बागायतदारांच्या उत्पादकतेसंदर्भातील दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आलंय. मद्यपानास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला नाही,” असं वक्तव्य आरोग्य मंत्री यांनी सोलापुरात केलंय.
“शेतकरी द्राक्ष बागायतदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी किराणा दुकानात आणि मॉलमध्ये वाइन विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आरोग्य विभाग कधीही मद्यपानाला प्रोत्साहन देऊ शकत नाही,” अशीही माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना दिली.