दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी सोमवारी म्हणजेच ३१ जानेवारी २०२२ रोजी मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी केलेल्या हिंसक निदर्शनांंनतर आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा ऑफलाइनच होतील असं स्पष्ट केलं आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे ऑनलाइन परीक्षा घेणं शक्य होणार नाही असं सांगितलं आहे. तसेच यामागील कारणांचा खुलासाही शिक्षण मंडळाकडून करण्यात आलाय.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होतील अशी माहिती दिली. याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांना विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन परीक्षांचा मागणी होत असल्यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना गोसावी यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक सुविधा उपलब्ध करुन देता येणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
“या परीक्षांचा फॉरमॅट पाहिला तर संक्षिप्त, सविस्तर आणि दिर्घोत्तर प्रश्न अशी रचना आहे. त्यात दोन्ही परीक्षांचा विचार केला तर ३१ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी असताना ऑनलाइन परीक्षा घेणं शक्य नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक सुविधा पुरवता येणार नाहीत,” असं गोसावी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येतील, असे शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी जाहीर केल्यानंतर ठरावीक वर्गातून या निर्णयाला विरोध होऊ लागला. समाजमाध्यमांवर अर्वाच्च भाषेतील मजकूर प्रसारित करणारा ‘हिंदूुस्थानी भाऊ’ विकास पाठक यानेही शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयाला विरोध केला. तसेच राज्यभरातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवा, अशी चिथावणी त्याने विद्यार्थ्यांना समाजमाध्यमावर दिली होती.
मी सोमवारी धारावीत जाऊन वर्षां गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन करेन, असेही त्याने समाजमाध्यमावर जाहीर केले होते. या ‘हिंदूुस्थानी भाऊ’ने रविवारी इस्टाग्रामवर संदेश पाठवून राज्यातील विविध शहरांमध्ये कधी आणि कुठे आंदोलन करायचे, याची माहिती प्रसारित केली. त्याच्या या संदेशांनी विद्यार्थ्यांना चिथावणी मिळाली आणि त्यानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा घेण्यात याव्यात यासाठी आंदोलनं केली होती. यामध्ये काही ठिकाणी हिंसाचारही झाला. या प्रकरणात हिंदूस्थानी भाऊला पोलिसांनी अटक केली असून त्याला ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.