शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांचा कोठडीमधील मुक्काम वाढलाय. नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आज त्यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती. मात्र भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने न्यायालयाचं कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे आज सुनावणी होणार नाहीय.
नितेश राणेंच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयामध्ये आज म्हणजेच सोमवारी दुपारी दोन वाजल्यानंतर सुनावणी होणं अपेक्षित होतं. मात्र भारतरत्न लता मंगेशकर यांचं दु:खद निधन झाल्याने राज्य सरकारने दुखवटा जाहीर करत सुट्टीची घोषणा केलीय. राज्य सरकारशीसंबंधित सर्व कार्यालयांबरोबरच न्यायालयीन कामकाज आणि बँकांचं कामकाजही बंद राहणार आहे. या सुट्टीचा आणि कामकाज बंद ठेवण्याच्या निर्णयाचा फटका नितेश राणेंच्या या सुनावणीला बसणार आहे.
सध्या नितेश राणे न्यायालयानी कोठडीमध्ये आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. आता मंगळवारी त्यांच्या खटल्याची सुनावणी होणार आहे. तुरुंगामध्ये न जाता प्रकृती अवस्थेचं कारण देत नितेश राणे सिंधुदुर्ग रुग्णालयात दाखल झालेत. आजची सुनावणी लांबल्याने त्यांचा मुक्काम वाढलाय. सरकारी वकिलांनी जिल्हा न्यायालयामध्ये म्हणणं मांडण्यास पुरेसा वेळ मिळाला नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी अशी मागणी केलेली. तेव्हा नितेश यांनी सुनावणी न्या. रोटे यांच्यासमोर नको अशी मागणी केली होती.
थेट गोव्यात नेऊन चौकशी…नितेश राणे यांना पोलिसांनी गुरुवारी (३ फेब्रुवारी रोजी) गोव्यात नेऊन या गुन्ह्याच्या कटाबाबत चौकशी केली. सुमारे दीड महिन्याच्या कायदेविषयक लढाईनंतर नितेश यांना पोलीस कोठडीत ठेवून चौकशी करण्यात बुधवारी संध्याकाळी पोलिसांना यश आल्यानंतर थेट गोव्यात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमदार नितेश यांना बुधवारी रात्रीच कणकवलीहून सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कोठडीत हलवण्यात आले. गुरुवारी सकाळी त्यांना पुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे सकाळी १०.३० वाजल्यापासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत म्हणजे तब्बल पाच तास राणे यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना गोव्याच्या दिशेने नेण्यात आले. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीबाबतचा तपशील मिळू शकला नाही. या हल्लाप्रकरणी त्यांच्यावर कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.