वर्धा : देशभर गाजलेल्या प्रा. अंकिता जळीतकांड प्रकरणात आरोपी विकी नगराळे याला न्यायालयाने दोषी ठरवले असून उद्या १० फेब्रुवारीला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. या घटनेला ३ फेब्रुवारीला २ वर्षे पूर्ण झाले. जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालले. आज बुधवारी आरोपीला दोषी ठरवण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.बी. भागवत यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिक्षेबाबत दोन्ही बाजूनी युक्तिवाद करण्यासाठी १ दिवसाची मुदत मिळाली. आता शिक्षेकडे लक्ष लागले आहे.
प्रा. अंकिता हिंगणघाटच्या महाविद्यालयात वनस्पतीशास्त्राची अर्धवेळ प्राध्यापक होती. ३ फेब्रुवारी २०२०ला दारोडा या आपल्या गावातून ती सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली. त्यावेळी आरोपी विकेशने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. नागपूरच्या खाजगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. महागडे उपचार करण्यासाठी कुटुंबाजवळ पुरेसे पैसे नसल्याने धावपळ होत असल्याची बाब ‘लोकसत्ता’ने निदर्शनात आणल्यावर राज्यशासनाने दोन टप्प्यात १५ लाखांची मदत रुग्णालयाकडे जमा केली होती. परंतु अखेरीस अंकिताने १० फेब्रुवारीला जगाचा निरोप घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी १९ दिवसात दोषारोप पत्र पूर्ण केले. हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात ४२६ पानांचे दोषाारोप पत्र सादर झाले. शासनाने या प्रकरणात अॅड. उज्ज्वल निकम यांची खास नियुक्ती केली.
एकूण २९ साक्षीदार तपासण्यात आले. घटनेपासून आरोपी कारागृहातच आहे. आज या प्रकरणाचा निकाल घोषित होण्याच्या शक्यतेमुळे सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
सरकारतर्फे मी न्यायालयाला विनंती केली की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खुनाच्या आरोपात जेव्हा आरोपीला दोषी ठरवण्यात येते तेव्हा दोन्ही बाजूूचे मत न्यायालयाने ऐकण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली जाते. आरोपीला कोणती शिक्षा द्यावी याबाबतचा एक तक्ता आम्ही न्यायालयात सादर करू. त्यानंतर न्यायालय शिक्षा जाहीर करू शकते. – अॅड. उज्ज्वल निकम, फिर्यादी पक्षाचे वकील.
आरोपीला दोषी ठरवणे आमच्यासाठी अन्यायकारक आहे. हा खटला सुरुवातीला प्रसारमाध्यमांनी चालवला. त्यांनी त्यावेळी जे भाष्य केले तसाच निकाल आज न्यायालयाने दिला आहे. उद्या मी न्यायालयात युक्तिवाद करणार नाही. या निकालाविरुद्ध वरच्या न्यायालयात दाद मागू. – अॅड. भुपेंद्र सोने, आरोपीचे वकील.
आरोपी दोषी सिद्ध होणे ही आमच्या कुटुंबासाठी तात्पुरत्या समाधानाची बाब आहे. त्याला ज्यावेळी फाशीची शिक्षा होईल तेव्हाच आमचे पूर्ण समाधान होईल. आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली तरच गुन्हेगारी वृत्तीला आळा बसेल. – अंकिताचे वडील.