पुष्पा चित्रपटाची जादू नेटकऱ्यांवर अजूनही कायम आहे. या चित्रपटाच्या रिल्सचा ट्रेंड सर्वदूर पसरला असून तरुण मंडळी या चित्रपटातील गाणी, संवाद, स्टाइलची कॉपी करताना दिसून येत आहे. एका चंदन तस्कराची गोष्ट असणाऱ्या पुष्पा चित्रपटाची चांगलीच चर्चा असताना या चित्रपटाची मदत पोलिसांना झालीय असं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. नंदुरबारमध्ये पुष्पा चित्रपटाशीसंबंधित एका हेअर स्टाइलमुळे आरोपीला पकडण्यात पोलिसांना पकडण्यात यश आले आहे.
शहादा तालुक्यातील डांबर खेडा येथील हरचंद कोळी यांचे ५० हजार रुपये दोन फेब्रुवारी रोजी प्रकाशा येथून चोरी गेले होते. एका हॉटेलवर हरचंद कोळी हे पाणी पिण्यासाठी थांबले असता त्यांचे पैसे चोरीला गेले. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळाली त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास सोपला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. गुप्त माहितीद्वारे या वृद्धाचे पैसे चोरणाऱ्या एका इसमाची हेअर कट ही फारच वेगळी असल्याची माहिती समोर आली. या आरोपीने डोक्यावर इंग्रजीत पुष्पा नाव कोरुन घेणारी हेअर कट केली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या टीमने तपास केला असता एका हेअर सलूनवर तळोदा येथील विनोद पवार या इसमाने पुष्पा नाव कोरलेल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे तळोदा तालुक्यातील छोटा धनपूर येथे जाऊन पोलिसांनी विनोद पवार यास अटक केली. तर दुसरा आरोपी राजू मोहाचे यास देखील धनपूर येथून अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरीचा गुन्हा कबूल केला. जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सदर वृद्धास शब्द दिला होता की तुमची रक्कम चोरणाऱ्या चोरांना आम्ही लवकरच बेड्या ठोकू व तुमचे चोरी झालेले पैसे हस्तगत करू. पोलिसांनी दिलेल्या शब्द पाळला असून अवघ्या आठ दिवसात आरोपींचा शोध लावून सदर रक्कम हस्तगत करण्यात आली आणि ती मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आली.
केवळ एका हेअरस्टाइलच्या आधारे चोरीचा छडा लावणाऱ्या तळोदा पोलिसांवर सध्या कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.