औरंगाबादः महाराष्ट्र राज्याच्या भल्यासाठी शिवसेना आणि भाजपमधील (Shiv Sena – BJP) वाट मिटावेत, अशी आमची इच्छा असल्याचं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी व्यक्त केलं. मंत्री रामदास आठवले हे दोन दिवसीय औरंगाबादच्या दौऱ्यावर असून सुभेदारी विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकारणावर (Maharashtra Politics) मोकळेपणाने भाष्य केले. भाजप आणि शिवेसेनतील भांडण मिटावे, अशी आमची इच्छा असून यासाठी शिवसेनेने किंबहुना उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
औरंगाबादमधील सुभेदारी विश्रामगृहावर मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे परस्परांवर जे आरोप प्रत्यारोप चालले आहेत, त्यावर पत्रकारांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली. यावेळी रामदास आठवले म्हणाले, हे तर कुत्र्या-मांजराचं भांडण आहे. पण कोण कुत्रा आणि कोण मांजर हे पहायला पाहिजे. हे भांडण मात्र आहे. हे मिटलं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यात पुढाकार घ्यावा आणि संजय राऊत यांना त्यांनी समज द्यावी. अपशब्द वापरण्यापेक्षा किंवा शिवराळ भाषा वापरण्यापेक्षा महाराष्ट्राची मराठी संस्कृती जपली पाहिजे. त्यामुळे हे भांडण आहे, ते होता कामा नये.
महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेऊन भाजपसोबतचे भांडण मिटवावे, असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले. ते म्हणाले, दोन्ही काँग्रेसमुळे शिवसेनेचे पुढील निवडणुकीत मोठं नुकसान होणार आहे. आम्हाला काही सत्तेची आवश्यकता नाही. आता अडीच वर्ष होत आलेली आहेत. अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना विचार करत असेल आणि बीजेपीही त्या फॉर्म्युल्यावर तयार होऊ शकेल. पण सध्या तरी शिवसेनेचं तसं काही चित्र दिसत नाहीये. या दोघांनी भविष्यासाठी एकत्र यावं, असं आमची इच्छा आहे. वाद मिटावा, अशी इच्छा चंद्रकांत दादा पाटील यांनीही व्यक्त केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हे आरोप-प्रत्यारोप थांबवावे, असं माझं मत आहे.
भाजप नेते नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यात अनियमित बांधकाम झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर मुंबई महापालिकेने या बंगल्याची चौकशी आणि तपासणी सुरु केली आहे. शिवसेनेचं हे सूडाचं राजकारण आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी यावेळी केली. ते म्हणाले, ‘ एवढे वर्ष का महापालिका झोपली होती का? घर बांधताना परवानगी देताना अधिकारी काय करत होते? प्रत्येक मजल्याची शहानिशा करूनच पुढचा मजला बांधण्याची परवानगी मिळते. त्यामुळे नियमितपणाने बांधकाम केलेलं असताना मुद्दाम त्याठिकाणी चौकशीला अधिकारी पाठवले आहेत. ही सूडाची भावना असू नये, एका बाजूला आमच्यावर ईडीच्या चौकशीचे आरोप करतात आणि दुसऱ्या बाजूला हे काय करतात? कंगना राणावतचं ऑफिसही तोडण्यात आलं. नंतर कोर्टानं नुकसान भरपाई देण्यास सांगितलं. नारायण राणे शिवसेनेत होते. मुख्यमंत्री राहिले आहेत. बाळासाहेब ठाकरेंचा विश्वास होता. शिवसेनेशी मतभेद झाल्यानंतर ते काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर बीजेपीत आले. त्यामुळे त्यांच्याविरोधात अशा पद्धतीनं महानगरपालिकेचे चौकशीचे आदेश चुकीचे आहेत.