समानतेच्या तत्वावर गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार चर्चा होताना पाहायला मिळाल्या आहेत. स्त्री-पुरुष समानतेसोबतच LGBTQ व्यक्तींना देखील समान वागणूक आणि व्यक्ती म्हणून सन्मान मिळावा, यासाठी अनेक सामाजिक संघटना देखील काम करत आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न होताना दिसत असताना आता एका मानसोपचार तज्ज्ञानंच केलेल्या वादग्रस्त विधानामुळे खळबळ उडाली आहे. “समलैंगिकता हा एक आजार आहे, मी त्यावर उपचार करून अनेक पुरुषांना ‘बरं’ केलं आहे”, असा दावा त्यांनी केला आहे. या मुद्द्यावरून वाद सुरू झाल्यानंतर संबंधित मानसोपचारतज्ज्ञांविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
डॉ. दीपक केळकर असं या मानसोपचार तज्ज्ञांचं नाव आहे. हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार केळकर यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर यासंदर्भातला एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये त्यांनी हा दावा केला आहे. “समलैंगिकता हा एक आजार असून त्यावर औषधांनी उपचार शक्य आहेत”, असं केळकर यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. या व्हिडीओवरून मोठा वाद सध्या निर्माण झाला असून त्यासंदर्भात केळकर यांची चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.
डॉ. केळकर यांच्याविरोधात मुंबईत एलजीबीटीक्यू समुदायासाठी काम करणाऱ्या डॉ. प्रसाद दांडेकर यांनी IPS (Indian Psychiatric Society)कडे तक्रार केली आहे. या तक्रारीची तातडीने दखल घेण्यात आली असून डॉ. केळकर यांची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती आयपीएसकडून देण्यात आली आहे.
“आयपीएसच्या एलजीबीटीक्यू टास्क फोर्सने सातत्याने या समुदायातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि समानतेची वागणूक देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, आयपीएसच्या या ध्येयाच्या विरोधात आयपीएसच्याच एका आजीवन सदस्यानं भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. यामुळे आयपीएसच्याच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे”, अशी प्रतिक्रिया एलजीबीटीक्यू समुदायासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अशोक कवी यांनी दिली आहे.
डॉ. दीपक केळकर यांनी २०११मध्ये त्यांचं यूट्यूब चॅनल लाँच केलं. केळकर यांनी आत्तापर्यंत त्यांच्या यूट्यूब चॅनलवर हजारो व्हिडिओ अपलोड केले आहेत. हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, केळकर यांनी ३ जानेवारी २०२२ रोजी अपलोड केलेल्या एका व्हिडीओमध्ये समलैंगिकांवर आपण उपचार केल्याचा दावा केला आहे. तसेच, औषधोपचारांच्या मदतीने पुरुषांना इतर पुरुषांकडे आकर्षित न होण्यासाठी देखील उपचार केले आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.