धुळे: येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या डॉ.पा. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रिय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान सप्ताह साजरा केला जात आहे. आज वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने सांजोरी ता. जि. धुळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी वनस्पतीवर विविध प्रयोगांचे आयोजन करण्यात आले. या शाळेतील चिमुकल्यांना विज्ञान दिनाचे महत्त्व पटवून देवून शेवाळ, बुरशी यांचे सूक्ष्मदर्शकयंत्र वापरून प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. याच वेळी वनस्पतीची विविधता आणि औषधी वनस्पती चे उपयोग सांगून वनस्पतीमुळेच सजीव सृष्टीची निर्मिती झाली आणि संपूर्ण सृष्टीला अन्न, वस्त्र व निवारा हे वनस्पतीमुळेच मिळतो त्यामुळे आपण सर्वांनी वनस्पतींची काळजी घेतली पाहिजे हे सांगितले. यावेळी विद्यार्थ्याना गुडमार या औषधी वनस्पतीमुळे एका मिनिटात तोंडाची चव निघून गेल्याचा प्रत्यक्ष अनुभव दिला गेला. परिसरामध्ये अशा औषधी वनस्पती पहावयास मिळतात त्याचा आपण आरोग्यासाठी उपयोग केला पाहिजे असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. दत्ता ढाले, डॉ. संजय क्षीरसागर, डॉ. अर्चना चौधरी, डॉ. ज्योती ढोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक श्री नवनीत अमृत सागर सर, श्रीमती पवार मॅडम, श्रीमती, महाले मॅडम इत्यादींनी मदत केली. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा. के. एम. बोरसे आणि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सौ . डॉ. संध्या पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रतिनिधी : चेतन सोनवणे मुकटी