औरंगाबाद : आपण मुलगी आहोत, बंधने येतील, समाज काय विचार करेल ? घरचे साथ देतील का ? असे अनेक विचार मनात येतील. त्यावर मात करीत समाजाचे पूर्वग्रह मोडीत काढा व स्वत:चे विश्व उभा करा ,असा संदेश मराठवाड्यातील यशस्वी युवतींनी (Marathwada Young girls) उपस्थित शेकडो विद्यार्थिनीना दिला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघाने यावर्षीच्या महिला दिनाचे (Women’s Day) घोषवाक्य हे ‘ब्रेक द बायस’ (Break the bias) हे ठेवले होते. त्या अनुषंगाने समाजाचे पूर्वग्रह मोडलेल्या यशस्वी युवतींसोबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद आणि यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात एस फॉर एस प्रा. लि . च्या संचालक निधी पंत,एव्हरेस्टवीर प्रा.मनिषा वाघमारे,दामिनी पथक प्रमुख नीआंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्लम साळुंखे व युवा व्यावसायिक प्राची जोशी यांचा सहभाग होता.अर्बन रिसर्च फाउंडेशन व नाट्यवल्ली या संस्थांचे सहकार्य या आयोजनात लाभले.
कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. बाळासाहेब पवार यांनी चूल आणि मूल ह्या संकल्पनेला आजच्या २१व्या शतकात बिलकुल जागा नाही असे प्रतिपादन केले. यावेळी बोलताना सायन्स फॉर सोसायटीच्या सहसंस्थापक निधी पंत यांनी स्वतःच्या प्रयत्नांवर संशय घेऊ नका, स्वतः ची संधी स्वतः शोधा आणि ध्येपूर्तीसाठी निर्भयपणे कूच करा,असे सांगितले. तसेच एस फॉर एस च्या वतीने ग्रामीण भागातील महिलाना सोबत घेऊन सौर वाळवण यंत्राच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली.संकल्प क्रियेशनच्या संचालिका प्राची जोशींनी त्यांचा एक उद्योजक म्हणून प्रवास उलगडत स्टार्टअपबद्दलच्या सर्व संकल्पना सोप्या शब्दात मांडल्या. कॉलेजसोबत आवडणारी अशी संकल्पना शोधा ज्यावर तुम्ही न थकता आयुष्यभर काम करू शकता,असे प्रतिपादन त्यांनी केले. एव्हरेस्टवीर प्रा.मनीषा वाघमारे यांनी त्यांच्या एव्हरेस्ट कामगिरीचा खडतर प्रवास मांडून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावरच यश गाठता येते असे सांगितले.
कोव्हिड -19 लॉकडाऊननंतर वाढलेले युवतींना ऑनलाईन त्रास देण्याचे प्रमाण,सायबर गुन्हा म्हणजे नेमके काय, त्याचे प्रकार इत्यादींचा उलगडा औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलाच्या दामिनी पाठक प्रमुख नीलम साळुंखे यांनी केला. या संवादात सहभागी यशस्वी युवतींसोबत अर्बन रिसर्च फॉऊंडेशनच्या पल्लवी देवरे आणि नाट्यवल्लीच्या प्रांजल हुसे यांनी संवाद साधला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुबोध जाधव,डॉ. संदीप कांबळे,गणेश घुले,श्रीनिवास देशमुख,प्रतीक राऊत,निखिल भालेराव,डॉ.महेश शेरकर,डॉ. सचिन मुंडे,डॉ. हिना खान,डॉ. राजेंद्र कवडे,गौरव कांडाळकर,डॉ. डोनेट जॉन,डॉ. पंकज गहूनगे आदींनी परिश्रम घेतले.