मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर मंगळवारी ईडीनं मोठी कारवाई केली. त्यांच्या साईबाबा गृहनिर्माण प्रा. लि.च्या मालकीच्या ११ सदनिका ईडीनं जप्त केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावरून टीका केली जात असताना सत्ताधाऱ्यांकडून मात्र केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. यातच आता मनसेकडून या सगळ्या मुद्द्यावर खोचक टोला लगावला आहे. यासाठी एका मराठी चित्रपटातली व्हिडीओ क्लिप ट्वीट करण्यात आली आहे. नेमकं झालं काय? उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या ११ सदनिका ईडीनं जप्त केल्या आहेत. ठाण्यातल्या वर्तकनगर या उच्चभ्रू भागात असलेल्या निलांबरी अपार्टमेंट्समध्ये या ११ सदनिका आहेत. हा साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. चा प्रकल्प असून त्यावरून वाद सुरू झाला आहे. काळा पैसा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या प्रकल्पाकडे वळवण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. यातून ही कारवाई करण्यात आली. मात्र, त्यातून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत
या सर्व प्रकरणानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. दुनियादारी या मराठी चित्रपटातली ही व्हिडीओ क्लिप असून त्यात जितेंद्र जोशीचा “मेव्हणे, मेव्हणे, मेव्हण्यांचे पाहुणे” हा डायलॉग दिसत आहे. या व्हिडीओसोबत “पाहुणे आले घरापर्यंत” अशी कॅप्शन देखील संदीप देशपांडे यांनी ट्वीट केली आहे.
निलांबरी अपार्टमेंट प्रकरणात ईडीकडून श्रीधर पाटणकर यांची देखील चौकशी होण्याची शक्यता असून त्यावरून आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. राज्य सरकारचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी देखील या चर्चेमध्ये सहभागी झाले होते. मात्र, यावेळी नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती कळू शकली नाही.