कोपरगाव : शहरात आज, बुधवारी नगरपालिकेतर्फे अचानक अतिक्रमण मोहीम राबवल्याने छोटय़ा मोठय़ा टपरीधारकांचे मोठे नुकसान झाले. ही कारवाई कोणतीही नोटीस न देता करण्यात आल्याचा टपरीधारकांचा आरोप आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही, अथवा नगरपालिकेच्या वतीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
या आधी प्रथम धारणगाव रस्ता, बस स्थानक परिसर, व्यापारी धर्मशाळेचा परिसर, शहरातील मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळय़ासमोरील परिसर येथेही अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान साईबाबा कॉर्नर येथे नगरपालिकेचा अतिक्रमण विभागाचा ताफा मुख्याधिकारी गोसावी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्यासह पोचला. तेथे त्यांनी श्री साई तपोभूमी सर्विस स्टेशन लगतच्या अनधिकृत भिंती व काही टपऱ्या उद्ध्वस्त करताना टपरीधारकांचा वीज प्रवाह खंडित केला. गेल्या दहा वर्षांपूर्वी शहरातील जवळपास पंधराशेच्या पुढे अतिक्रमणे काढण्यात आली होती. सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
अतिक्रमणे काढण्याबाबत तहसील कार्यालयात बैठक झाली असल्याचे खात्रीलायक समजले. ही कारवाई करताना दुजाभाव करण्यात आला असून, एकमेकांच्या सांगण्यावरून अतिक्रमणे काढण्यात आली, असे आरोप होत आहेत. साडेसातपर्यंत ही कारवाई सुरू होती. त्यानंतर अतिक्रमण विभागाचा फौजफाटा व पोलीस व मुख्याधिकारी घटनास्थळावरून निघून गेले.