मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) यांच्या भावाने गायक पद्मश्री सोनू निगम (Singer Padmshri Sonu Nigam) याला धमकी दिल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. इक्बाल सिंह चहल यांचा भाऊ रजिंदर याने सोनू निगमला धमकी दिल्याचं बोललं जात होतं. इक्बाल सिंग चहल यांनी त्यांचा भाऊ राजिंदरसाठी सोनूला कार्यक्रम करण्याची विनंती केली होती. सोनू सध्या काही कामात व्यस्त असल्याने त्याने काही आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांची नावं सुचवली. पण ही गोष्ट रजिंदर यांना आवडली नाही आणि त्यांनी सोनू निगमला काही मेसेज केले. यातले काही मेसेजेस आक्षेपार्ह आहेत. त्या मेसेजमधली भाषा योग्य नाही. या मेसेजच्या माध्यमातून सोनूला धमकी देण्यात आली असल्याचं बोललं जात होतं. याबाबतची भाजप आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. यावर आता खुद्द इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही”, असं चहल म्हणाले आहेत.
या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही-चहल
या सगळ्या प्रकरणी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “सोनू निगम यांना ज्यानं धमकावल्याचा दावा केला जात आहे. त्या रजिंदरशी माझा काहीही संबंध नाही. रजिंदर माझा चुलत भाऊ नाही. मी जिथून येतो त्या राजस्थानमधून हा रजिंदरही आहे.जर तो काही चुकीचा वागला असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. पण माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही”, असं चहल म्हणाले आहेत.
चौकशी करा- अमित साटम
“पद्मश्री सोनू निगम यांना पालिका आयिक्त इक्बाल सिंह चहल यांचे नातेवाईक असलेले रजिंदर धमकी देत आहेत. त्यांना फ्री शो करण्यास सांगत आहेत. त्यांना धमक्या देत आहेत… यात सोनू निगम यांना भिती वाटतेय की जसं चहल इतर लोकांच्या घरावर बुलडोझर चालवत कारवाई करत आहेत तशीच त्यांच्या घरावरही करतील. त्यामुळे या प्रकरणात गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं. याची चौकशी करावी, असा मुद्दा मी विधानसभेत मांडला”, असं भाजप आमदार अमित साटम म्हणालेत.
प्रकरण काय आहे?
इक्बाल सिंह चहल यांचा भाऊ रजिंदर याने सोनू निगमला धमकी दिल्याची बातमी आली होती. इक्बाल सिंग चहल यांनी त्यांचा भाऊ राजिंदरसाठी सोनूला कार्यक्रम करण्याची विनंती केली होती. सोनू सध्या काही कामात व्यस्त असल्याने त्याने काही आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांची नावं सुचवली. पण ही गोष्ट रजिंदर यांना आवडली नाही आणि त्यांनी सोनू निगमला काही मेसेज केले.यातले काही मेसेजेस आक्षेपार्ह आहेत. त्या मेसेजमधली भाषा योग्य नाही. या मेसेजच्या माध्यमातून सोनूला धमकी देण्यात आली असल्याचं बोललं जात होतं. याला आता आमदार साटम यांनी विधानसभेत मुद्दा मांडत याला दुजोरा दिला आहे. तर चहलही यांनी या प्रकरणी आपली बाजू मांडली आहे.