केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस की शिवसेना इथपासून तर अगदी ममता की केजरीवाल इथपर्यंत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. ते पीएनजीच्या समारंभातील एका मुलाखती दरम्यान रॅपिड फायरच्या प्रश्नांना उत्तरं देताना बोलत होते. यावेळी नितीन गडकरी यांनी ते केवळ निवडणुकीच्या काळात १५ दिवस राजकारण करतात. त्यानंतर कधीही राजकारण करत नाही, असं सांगितलं. तसेच आपल्याकडे सर्वच पक्षांचे कार्यकर्ते कामासाठी येतात. कोणताही भेदभाव न करता त्यांची कामं करतो असंही गडकरींनी नमूद केलं.
नितीन गडकरी यांनी मुलाखतीत विचारलेले ९ प्रश्न आणि त्याची उत्तरं खालीलप्रमाणे,
प्रश्न १. एकदिवसीय क्रिकेट की कसोटी?उत्तर – एकदिवसीय क्रिकेट
प्रश्न २. व्यंगसरकर की के. श्रीकांत?उत्तर – श्रीकांत
नितीन गडकरी पुढे म्हणाले, “व्यंगसरकर आणि श्रीकांत दोघेही माझे मित्र आहेत. श्रीकांत कमी धावा काढायचे पण मला श्रीकांत आवडायचे. ते प्रत्येक चेंडूवर उभा-आडवा होऊन खेळायचे. ते वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांना पहिल्या चेंडूपासून ठोकायचा. मात्र, नागपूरला दिलीप व्यंगसरकर यांची एन्ट्री झाली. तेव्हा शेष भारत संघाकडून प्रसन्न आणि बेदी गोलंदाज होते.”
“मुंबईकडून व्यंगसरकर होते. तेव्हा वानखेडे, साळवे सर होते. तेव्हा व्यंगसरकर यांनी शतक झळकावलं होतं. मी आयुष्यात ते शतक विसरलो नाही. प्रसन्न आणि बेदी यांनी आयुष्यात कधीही अशी कल्पना केली नसेल इतकं व्यंगसरकर यांनी चौकार आणि षटकार मारत ठोकून काढलं. तेही चांगलं खेळतात,” असंही गडकरींनी नमूद केलं.
प्रश्न ३. मुकेश की गुलाम अली?उत्तर – मुकेश
प्रश्न ४. मिसळ की भजी?उत्तर – मिसळ
प्रश्न ५. गोड पदार्थांमध्ये श्रीखंड की बासुंदी?उत्तर – आता दोन्हीही खात नाही. मात्र, चितळेचं श्रीखंड खातो.
प्रश्न ६. मुंबई की नागपूर?उत्तर – नागपूर
प्रश्न ७. राष्ट्रवादी की शिवसेना?उत्तर – मला भाजपा आवडतं.
प्रश्न ८. ममता की केजरीवाल?
नितीन गडकरी म्हणाले, “दोघेही माझे चांगले मित्र आहेत. ममता मला दिल्लीला भेटायला आल्या तेव्हा त्या फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलाच भेटल्या. त्यांनी मडक्यात बंगालमधून रसगुल्ले आणले होते. एकाच पक्षातील नेता आपल्या पक्षातील नेत्याला पसंत करत नाही. मात्र, मला फारुख अब्दुल्लांपासून ओवैसींपर्यंत सर्वच पक्षातील नेत्यांनी अभिनंदन केलं, धन्यवाद दिले.”
प्रश्न ९. मराठी की हिंदी?
नितीन गडकरी म्हणाले, “मला मराठी पेक्षा हिंदी चांगली बोलता येते असं म्हणतात. नागपूर जुन्या मध्यप्रदेश आणि इतर राज्यांचा भाग असल्याने तेथे हिंदी चांगली बोलले जाते. मी दिल्लीत हिंदीच बोलतो. केरळ, तामिळनाडू या ठिकाणी हिंदी चालत नाही. तेथे मी इंग्रजी बोलतो.”