मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जीएसटी भवनाच्या इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना विरोधकांवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत, असं वारंवार बोललं जात असल्यावरून मुख्यमंत्र्यांनी विधान केलं आहे. “सरकारमध्ये रुसवे, फुगवे सुरू असल्याचं वातावरण तयार केलं जातय.” असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
वडाळा येथील वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे पार पडले. यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार राहूल शेवाळे, विधान परिषद सदस्य आर. तमिल सेलवन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, पोर्ट ट्रस्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक राजीव जलोटा, आयुक्त वस्तू आणि सेवा कर राजीव मित्तल, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “एक वातावरण तयार केलं जातय, की सरकारमध्ये कुठेतरी रुसवे, फुगवे सुरू आहेत. मात्र तसं काही नाही. आपण हे सरकार जे स्थापन केलं, त्याचं नावच महाविकास आघाडी असं ठेवलं आहे. महाविकास हे केवळ आपल्या नावामध्ये नाही तर तो जमिनीवरती प्रत्यक्ष आपण अंमलात आणतो आहोत.”
याचबरोबर, “आपण आपल्या राजकीय आयुष्यात पाहीलेलं आहे, अनेकदा घोषणा होतात, नारळवाल्यांचा खप जोरदार होतो, कारण अनेकवेळेला अनेकजण नारळ फोडतात आणि मग त्या कोनशीला तशाच असतात. कारण नंतर त्या शीलेला कोणी विचारतच नाही, म्हणून तिला कोनशीला म्हणतात की काय मला कल्पना नाही. परंतु तसं नाही आजचं भूमीपूजन हे केवळ नारळ फोडण्यासाठी नाही. प्रत्यक्ष काम आजपासून सुरू करत आहोत आणि हे आपल्या कामाचं एक उदाहरण जे सगळ्यांसमोर ठेवतोय. ते पाहिल्यानंतर मग जो आपल्यावरती रुसवा, फुगवा किंवा आपल्यामध्ये कटुता निर्माण व्हावी अशा काहीजण मनाच्या गुढ्या ते उभारत आहेत. कारण त्यांना दुसरा उद्योग नाही, कामाच्या गुढ्या उभारू शकत नाहीत. मग सरकार पडण्याच्या आणि पाडण्याच्या गुढ्या ते मनातल्या मनात उभारत असतात. त्यांना आपण आपल्या कृतीतून दिलेलं हे चोख उत्तर आहे.” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांवर निशाणा साधला.
“जीएसटी इमारतीच्या भूमिपूजनाचे श्रेय अजित पवार यांना आहे. त्यांनी आणि या सरकारने प्रत्यक्ष या इमारतीच्या जागेसाठी पाठपुरावा केला, अनेक परवानग्या मिळवल्या. मागील दोन वर्षे आपण प्रत्यक्ष कामात दिसलो नव्हतो पण त्यापाठीमागे आपण अनेक विकास कामांचे नियोजन केलं. त्यातूनच आजच्या पर्यावरणपूरक नवीन वास्तूचे भूमिपूजन होत आहे. इमारतीचे संकल्पचित्र अप्रतिम आहे.”
“सध्या जे वातावरण निर्माण केले जात आहे, महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु आहे, त्या महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारे राज्य नसते तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागला असता. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करू नका.आज भूमिपूजन होत असलेली इमारत २०२५ पर्यंत बांधून पूर्ण होईल. आज भूमिपूजन होत असलेली इमारत इतकी देखणी असावी की लोकांनी ती पाहण्यासाठी यावी, देशातील जीएसटी विभागाच्या इमारतीपैकी ही इमारत सर्वात देखणी इमारत ठरावी.”
“ही शासकीय इमारत असली तरी ती शासकीय वाटणार नाही अशा पद्धतीने याचे काम व्हावे. करदाता या इमारतीत आल्यावर त्याला प्रसन्न वाटलं पाहिजे, आपण देत असलेल्या कराचा राज्याच्या विकासाला योग्य उपयोग होत आहे याचा आनंद त्याला इथं आल्यावर वाटला पाहिजे. यादृष्टीने आपण सर्वोत्तम काम कराल यात शंका नाही. अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण महत्वाचे. कामाच्या प्रशिक्षणाबरोबर जनतेशी कसं वागावं आणि येणारा माणूस हसतमुखाने परत गेला पाहिजे याकडेही लक्ष द्या.”
“मनातील संकल्प पूर्ण करायला राज्याच्या तिजोरीत अर्थबळ लागते. वस्तू आणि सेवा कर राज्य अर्थव्यवस्थेचा पाठकणा असून तो मजबूत झालाच पाहिजे. या कर संकलनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाच राज्य आहे, ही अभिमानाची बाब आहे. त्यासाठी सर्व अधिकारी -कर्मचारी आणि अजित दादांना लाख लाख धन्यवाद.”