शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांमध्ये सातत्याने कलगीतुरा रंगताना पाहायला मिळतो. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. राज्यातील सध्याचं राजकीय वातावरण आणि निर्माण झालेली परिस्थिती या पार्श्वभूमीवर आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, यावेळी केंद्रावर खोचक शब्दांत टीका देखील केली आहे. देशात निर्माण झालेल्या महागाईच्या संकटावर यामध्ये निशाणा साधण्यात आला आहे.
“आज महाराष्ट्रातील जनताही करोनाचा विनाश करून भयमुक्त आणि संकटमुक्त झाली आहे. त्यात करोना काळात लावण्यात आलेले निर्बंध उठवून राज्यातील आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला ‘पाडवा भेट’च दिली आहे”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, पाडव्याच्या शुभेच्छा देतानाच महागाईवरून शिवसेनेने टोला लगावला आहे. “महाराष्ट्र आणि देशातील जनतेने करोनाच्या विषाणूवर विजय मिळवून आयुष्याच्या नवीन वाटचालीचा श्रीगणेशा सुरू केला हे खरे असले, तरी महागाईच्या सरकारनिर्मित विषाणूला तोंड कसे द्यायचे? याचे मात्र कुठलेही उत्तर जनतेला सापडताना दिसत नाही. निवडणुकीपुरती स्वस्ताईची गुढी उभारून निवडणुका संपल्यावर महागाईची काठी उगारणाऱ्या केंद्रीय सरकारशी नवीन वर्षाच जनतेला दोन हात करावे लागतील असे दिसते”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
“करोनाा राक्षस गाडून जनतेने एक युद्ध जिंकलं आहे. आता जनतेला नवनिर्मितीबरोबरच महागाईला गाडण्यासाठी संघर्षाचीही गुढी उभारावीच लागेल”, असं देखील नमूद करण्यात आलं आहे.