राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचा भाजपाने जणू प्रणच घेतला आहे. सरकार स्थापन झाल्यादिवसापासून हे सरकार लवकरच पडणार असं सातत्याने भाजपाकडून सांगितलं जात आहे. त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्याही चर्चा आहेत. या चर्चांवर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी भाष्य केलं असलं तरी काही ना काही कारणाने या चर्चा उफाळून वर येत आहेत. यावरच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “काही खासदारांनी आपल्या भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शिवसंवाद दौऱ्यासाठी खासदार गेले होते, चार चार दिवस जिल्ह्यात राहिले. संघटनात्मक बांधणीबद्दल अहवाल बनवले. आता अधिवेशन संपल्यावर उद्धव ठाकरेंसोबत सगळ्यांची बैठक होईल. महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांबद्दल तक्रारी येत आहेत पण त्या तक्रारींमध्ये तथ्य़ नाही.. काही ठिकाणी मजबुतीने काम करावं लागेल. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला हे सरकार आपलं आहे असं वाटावं. मविआतल्या प्रत्येक मंत्र्याचं हे कर्तव्य आहे की पक्ष न पाहता त्यांनी प्रत्येकाचं ऐकून घेतलं पाहिजे. नाराजी असणं हे सामान्य आहे. त्यासाठी एकत्र बसून सूचना द्यावा लागतील. आपण जर पालकमंत्री असू तर खाली शिवसेना आहे, त्यामुळे त्यांच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. हा सर्वच पालकमंत्र्यांसाठी इशारा आहे”.
मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा किंवा मंत्रिमंडळात काही खांदेपालट करायचा हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. त्यासंदर्भात तीन पक्ष मिळून मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय घेतील. त्यावर मी दिल्लीत बसून बोलणं योग्य नाही. नक्कीच काँग्रेसचे आमदार आलेले आहेत. ते काल वेणुगोपालना भेटले. माझीही त्यांच्याशी चर्चा झाली. प्रत्येकजण आपल्या हायकमांडला भेटायला येत असतो. आता शिवसेना सोडली तर प्रत्येकाचे हायकमांड दिल्लीतच आहेत.
संजय राऊत म्हणाले,”आम्ही संघर्ष करत नाही. त्यांना खाजवायची सवय आहे. आता त्यांची खाज कधी संपेल माहित नाही. पण एवढी पण खाज बरी नाही”.
अजानच्या भोंग्यांबद्दल सध्या राज्यात चाललेल्या चर्चांबद्दल संजय राऊत म्हणतात, “राज्य सरकारचे आदेश असूनही अनेक राज्यांमध्ये अजानवरचे भोंगे उतरलेले नाहीत. त्यात भाजपाशासित राज्यांचं प्रमाणही जास्त आहे. मी गोव्यात होतो, तिथेही मी अनेकदा अजान ऐकायचो, उत्तर प्रदेशातले भोंगे तसेच आहेत. काल महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यांचं पालन व्हायला हवं”.
भाजपा आणि ईडी कारवाईसंदर्भात भाष्य करताना संजय राऊत म्हणाले,”पैसे महाराष्ट्रात जपून खर्च करा. तुम्ही भाजी जरी खरेदी केलीत तरी तुमच्यावर भाजपाचं लक्ष आहे. तुम्ही चिकन खरेदी करायला गेलात तरी तुम्ही किती किलो चिकन घेतलंत, काल किती घेतलं, आज किती घेतलं यावर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे, ते लगेच ईडीला कळवतील त्यामुळे सगळ्यांनी सावध राहायला हवं”.