लोकसभेत चर्चेदरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची जीभ घसरली आणि त्यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आपल्यात नाहीत, असं म्हटलं. जेव्हा रिजिजू यांना सुप्रिया सुळे काय बोलल्या हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी मजेशीर उत्तर देत आपण अजूनही जिवंत असल्याचं सांगितले. मात्र, तोपर्यंत सुप्रिया सुळे यांनी आपली चूक सुधारत माफी मागितली होती.
झालं असं की सुप्रिया सुळे किरेन रिजिजूंचे कौतुक करत होत्या, पण ही स्तुती तेव्हाची होती जेव्हा रिजिजू क्रीडा राज्यमंत्री होते. हेच सांगताना सुप्रिया सुळे यांनी चूक केली आणि रिजिजू आता मंत्रालयात नाहीत, असं म्हणण्याऐवजी केंद्रीय मंत्री राहिले नाहीत, असं म्हटलं. त्यानंतरही त्यांचं बोलणं सुरू होतं, परंतु त्यांना त्यांची चूक लक्षात आली नाही.सभागृहात उपस्थित इतर सदस्यांनी याकडे सुप्रियांचे लक्ष वेधले असता त्यांनाही धक्का बसला. त्यांच्या या विधानाची सर्वप्रथम काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी दखल घेतली. रिजिजू आता क्रीडामंत्री राहिलेले नाहीत, असे सांगत काँग्रेस नेत्याने सुळे यांचं विधान दुरुस्त केलं. यानंतर सुळे यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी ती सुधारून माफी मागितली.\
जेव्हा रिजिजूंना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी ट्विट केले आणि ते म्हणाले की ‘सुप्रियाजी मी अजूनही जिवंत आहे आणि आपले कर्तव्य बजावत आहे.’ दरम्यान, यावेळी सुप्रिया सुळेंनी केलेल्या कौतुकाबद्दल रिजिजू यांनी आभार मानले.
अरुणाचल प्रदेशमधून तीन वेळा खासदार असलेले रिजिजू हे यापूर्वी क्रीडा राज्यमंत्री होते, परंतु २०२१ च्या मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांना कायदा मंत्री करण्यात आले. सध्या ते कायदा मंत्री म्हणून काम पाहत आहेत.