अमरावती : एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न राज्य सरकारने सातत्याने केले आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व चुकीच्या हाती गेले. काही लोक कामगारांना भडकविण्याचे काम करीत आहेत. मुंबईत घडलेल्या घटनेला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या विरोधकांना लक्ष्य केले. येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात रविवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे या वेळी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, राज्यातील सत्ता आपल्या हाती आली आहे, पण दिवस सोपे राहिलेले नाहीत. सत्तेपासून वंचित असलेले अनेक लोक अस्वस्थ आहेत. देशातील सत्तेचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार कसे अडचणीत येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आघाडीतील नेत्यांवर आरोप केले जात आहेत, दोन मंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचे कामही या लोकांनी केले आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसला त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे; पण आपण सामूहिक शक्ती उभी केली तर त्यांचे प्रयत्न निश्चितपणे हाणून पाडता येतील.
मूळ प्रश्नांना बगल
केंद्र सरकार देशात जातीय द्वेषाचे राजकारण करीत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. देशात पेट्रोल, डिझेलची दरवाढ, महागाई हे प्रश्न गंभीर होत असताना, त्यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा त्यांचा हेतू आहे, अशी टीकाही पवार यांनी केली. दरम्यान, राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे काम कोण करीत आहे, हे महाराष्ट्र ओळखून आहे, असे जयंत पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांनीही भाजपवर टीका केली.