प्रतिनिधी, ११ मे २०२२ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल असा इशारा दिला आहे. धमकीच्या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आले असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज सकाळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची या संदर्भात भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी नेमकी काय चर्चा केली होती याची माहिती दिली नव्हती. भेटीनंतर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या भेटीचं कारण उघड केलं आणि राज ठाकरेंना धमकी मिळाली असल्याची माहिती दिली.“मला एक धमकीचं पत्र आलं आहे. भोंग्याचा विषय समोर आल्यापासून अशा प्रकारच्या धमक्या मिळत आहे. पत्रात माझ्यासोबत राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मी राज ठाकरेंना पत्र दाखवलं आणि काल संध्याकाळी पोलीस आयुक्तांना भेटलो. पत्राची प्रत त्यांना दिली आहे. पोलीस काय कारवाई करतात ते पाहू,” असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. “अजानबाबात जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करु. तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू,” असं पत्रात लिहिलं असल्याची माहिती नांदगावकरांनी यावेळी दिली. हे हिंदी पत्र असून त्यात उर्दू शब्दही आहेत अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.