प्रतिनिधी, ११ मे २०२२ :- महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. तारखा घोषित केल्या नसल्या तरी पक्षामार्फत निवडणुतिची तयारी ही सुरु झाली आहे. आम आदमी पार्टी पहिल्यांदा मुंबईत निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे आपही निवडणुकीची जोमात तयारी करताना दिसत आहे. आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा पाढाच वाचला आहे. आम आदमी पार्टीच्या मुंबईच्या सदस्यांनी दरवर्षी पावसाचे पाणी साचते त्याची पाहणी केली. त्यात नद्या, नाले आणि स्टॉर्म वॉटर ड्रेन (SWDS) ची पाहणी केली आणि मान्सूनपूर्व गाळ काढला जात नसल्याचे पाहून त्यांना धक्का बसला असून पुन्हा एकदा "मुंबईची तुंबाई" होणार आहे. यामुळे मुंबईकरांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा नालेसफाई बाबत भ्रष्ट कारभार उघडकीस आणण्यासाठी प्रीती शर्मा मेनन यांनी मुंबई आम आदमी पार्टीच्या फोर्ट कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. प्रीती शर्मा मेनन यांनी महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराची भांडाफोड करत महानगरपालिकेवर हल्लाबोल केला. मुंबईत पावसाळा सुरू होण्यास फक्त दोन आठवडे उरले आहेत परंतु पुन्हा एकदा नद्या, नाले आणि स्टॉर्म वॉटर ड्रेन गाळ आणि डेब्रिज साफ करण्यात मुंबई महानगरपालिका अपयशी ठरली आहे. पावसात नद्या, नाले ओव्हरफ्लो होतील व पुन्हा एकदा शहरातील प्रमुख भागांमध्ये पाणी साचून मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. महानगरपालिका नाले सफाई पूर्ण झाल्याचे आश्वासन देते आणि नाले सफाईची आकडेवारी जाहीर करते. महानगरपालिका स्वतःची कागदपत्रे तसेच त्यांचा ऑनलाइन ट्रॅकर यावर विश्वास ठेवला तर शहरातील केवळ ४३% नाले, स्टॉर्म वॉटर ड्रेन आणि फक्त ८४% मिठी नदीचे मलनिस्सारण झाले आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार पोईसर नदी, चंद्रावरकर नाल्यासह नाल्यांचा मोठा भाग तसेच इतर ४८ नाल्यांचे गाळ काढण्यास सुरुवातही झालेली नाही. दक्षिण मुंबईतील केवळ २८% नाले व स्ट्रॉम वॉटर ड्रेन नाल्यांचे गाळ काढण्यात आले आहे. पूर्व उपनगरातील नाले आणि एसडब्ल्यूडी पैकी फक्त ५८% साफ झाले आहेत. त्याचप्रमाणे पश्चिम उपनगरात ५०% नाले आणि स्ट्रॉम वॉटर ड्रेन ची साफसफाई झालेली नाही. एकूणच बीएमसीने शहरातील लहान नाल्यांपैकी केवळ ५५% नाले साफ केले असल्याचे मान्य केले असून यातून पुन्हा एकदा पालिका नाले सफाई बाबत कुचकामी ठरली असल्याचे सिद्ध झाले आहे, असे प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या.
धक्कादायक सत्य हे आहे की, हे आकडेही खोटे असून वास्तविकतेच्या जवळपासही महानगरपालिका पोहोचू शकलेली नाही. आम आदमी पार्टीच्या ग्राउंड टीमने मिठीसह विविध ठिकाणी पाहिले की जोगेश्वरी, बी.के सी, वांद्रे पूर्व आणि कलिना येथे नदी अजूनही तुडूंब तुंबलेली आहेत. यामुळे सर्व पश्चिम उपनगरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. पूर्व उपनगरांची स्थिती अधिक वाईट आहे कारण एकाही नाल्याचा गाळ उपसण्यात आलेला नाही आणि महानगरपालिकेकडून ५८% गाळ उपसण्यात आला असल्याचे सांगण्यात आले असून हा दावा पूर्णपणे खोटा आहे हे सिद्ध झालं आहे.
"शिवसेना सरकारने मुंबईत वर्षानुवर्षे होणाऱ्या मृत्यू आणि विध्वंसाबाबत पूर्ण उदासीनता दाखवली आहे. बीएमसीमध्ये तीन दशके सत्तेत असताना आणि आता राज्यातही त्यांचा एकमेव हित मुंबई महानगरपालिका लूट करण्यातच त्याचा हातखंडा राहिला आहे. मान्सूनची तयारी ही वाईट गुन्हेगारी हेतूपासून कमी नाही. "स्पिरिट ऑफ मुंबई" च्या भूताला गाडून टाकण्याची आणि पुरासाठी जबाबदार असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची वेळ आली आहे, असे मत मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.
"मिठी नदीच्या स्वच्छतेच्या अहवालामागील निव्वळ खोटेपणा हे सिद्ध करते की मुंबई महानगरपालिका नालेसफाई करण्यात कमकुवत आहे. नदीची सफाई करणारे कंत्राटदार आणि महापालिका अधिकारी यांच्यात मोठ्या प्रमाणात संगनमत असल्याचे दिसते आणि त्यांना वाटते की मुंबईकरांचा जीव स्वस्त आहे. परंतु त्यांना किंमत मोजावी लागेल. असे आप नेते आणि मुंबईचे रिव्हरमन गोपाल झवेरी यांनी म्हटले आहे.
आम आदमी पार्टीची मागणी आहे की, मान्सूनपूर्व तयारीचे लेखापरीक्षण करण्यासाठी बाह्य स्वतंत्र संस्थेची नियुक्ती करण्यात यावी आणि सर्व कंत्राटदार आणि अधिकारी जे काम करण्यात अयशस्वी ठरले आहेत. ज्यांनी आकडेवारी चुकीची नोंदवली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. आणि या पावसाळ्यात शहरात पुन्हा पूर आल्यास त्या प्रभागातील नगरसेवकांवर निष्काळजीपणाचे गुन्हे दाखल करावेत. या गुन्हेगारांना तुरुंगात टाकण्याची वेळ आली आहे, असे मत पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आले.