प्रतिनिधी, ११ मे २०२२ :- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित संशयावरून एनआयएने २९ ठिकाणी छापेमारी केली होती. यात सुहेल खंडवाणी, छोटा शकीलचा साडू सलीम फ्रुट यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यातील सुहेल खंडवाणी यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात जाहीर सत्कार २७ नोव्हेंबर २०२१ रोजी केल्याची धक्कादायक माहिती स्प्राऊट्स च्या स्पेशल इन्व्हेन्स्टिगेटीगेशन टीमच्या हाती लागली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बेकायदेशीरपणे बसवलेले त्यांचे भ्रष्ट सचिव उल्हास मुणगेकर यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली होती. मुणगेकर हे राजभवनातील सचिन वाझे आहेत. त्यांनी अवैध मार्गाने कोट्यवधी रुपयांची काळी माया जमा केली आहे. त्यांची त्वरित चौकशी करण्यात यावी व त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेन्स्टिगेटीगेशन टीमने व सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार केली होती. मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी या भ्रष्ट मुणगेकर यांना कायम पाठीशी घातले आहे.राज्यपाल कोश्यारी यांना केवळ सत्कार समारंभ करण्यात रस आहे. प्रश्न सोडवण्यात नाही. त्याचाच फायदा घेऊन मुणगेकर यांनी महत्त्वाचे प्रश्न, समस्या या राज्यपालांपर्यंत कधीच पोहोचू दिल्या नाहीत. त्या भ्रष्ट मार्गाने मॅनेज केल्या. इतकेच नव्हे तर पैसे खाऊन गुंड, आरोपी, खंडणीखोरांना राजभवनात येण्यास परवानगी दिली. त्यांच्याच कृपेने राजभवनात अवैध पीएचडी वाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला. याशिवाय अवैध पीएचडी देणारा मधू कृष्णा यांच्या काळ्या धंद्यातही मुणगेकर सामील आहेत.