प्रतिनिधी, १७ मे २०२२ :- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची कथित कोंडी करण्यासाठी सोमवारी पहाटेपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेने तब्बल २९ ठिकाणी धाडी टाकल्या. नागपाडा, मुंब्रा, गोरेगाव, माहीम, सांताक्रूझ, भेंडीबाजार, ग्रँडरोड येथे छापे मारले. यावेळी छोटा शकील याचा नातेवाईक सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट, अब्दुल कय्युम, सोहेल खंडवानी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या ताब्यात घेतलेल्यांपैकी सोहेल खंडवानी हा याकूब मेमन याचा साथीदार होता. याकूब मेमन हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी टायगर मेमन याचा भाऊ होता. (याकूब मेमन याला २०१५ साली फाशीही देण्यात आले होते.) राष्ट्रीय तपास संस्थेने नोव्हेंबर १९९५ साली सोहेल खंडवानी यांच्याकडून ४४ लाख रुपये जप्त केले होते. याशिवाय मे १९९५ मध्ये गोव्याचे तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी खंडवानी यांना दिलेले ६० लाख रुपये जप्त केले होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. खंडवानी यांची ही अंडरवर्ल्डशी संबंधित गुन्हेगारी पार्श्वभूमी सर्वानाच माहिती आहे. याच खंडवानी यांनी राजभवन येथे २७ नोव्हेंबर २०२१ रोजी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते खंडवानी यांच्यासह सर्वांचा सत्कार करण्यात आला होता. राजभवनात राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांचे बेकायदेशीरपणे बसलेले भ्रष्ट सचिव उल्हास मुणगेकर यांनी या कार्यक्रमाला लाच घेवून मान्यता दिली होती. त्यामुळे मुणगेकर यांना लाच दिल्यास गुंड, फसवे इतकेच काय पण अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या कोणालाही राजभवनात प्रवेश मिळू शकतो, हे या उदाहरणावरून स्पष्ट होते. 'स्प्राऊट्स'च्या इन्व्हेस्टीगेशन टीमने ही सारी गैरप्रकरणे बाहेर काढली, मात्र राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी या साऱ्या गैरप्रकारांवर पांघरून घालण्याचे काम करत आहेत.