हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील असलेल्या वसमत तालुक्यातील कुरुंदा गावात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात पुराचे पाणी शिरले आहे गावातील अनेकांना स्थलांतरित करण्यात आले तसेच आसना नदीला देखील आलेल्या पुराने किन्होळा गावात पुराचे पाणी शिरले आहे. याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन नागरीकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना शनिवारी फोनवरून दिले आहेत.
तसेच टाकळगव्हाण येथे अडकलेल्या दोन कुटुंबांना तातडीने सुरक्षित बाहेर काढावे, जिल्हयातील सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरात मोठा पाऊस झाला १७९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे गिरगाव मंडळात देखील अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे कुरुंदा सोबत आणखी काही गावातही नुकसान झाले आहे.या पावसामुळे विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून मोबाईल नेटवर्कही बाधित झाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मोबाईलवरुन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी संवाद साधून पुर परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला. पुरात अडकलेल्या टाकळगव्हाण गावातील दोन कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी मदतकार्य तातडीने सुरु करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पुर परिस्थितीमध्ये जिवीत हानी होणार नाही याची काळजी घ्यावी, स्थलांतरीत झालेल्या कुटुंबाच्या भोजनाची, पाण्याची व्यवस्था करावी त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ देऊ नका सर्व अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी पुरग्रस्त भागात पाठविण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना दिल्या आहेत.