पंढरपूर : प्रथेप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. विशेष म्हणजे नातवाला कडेवर घेऊन मुख्यमंत्र्यांनी पूजा केली. पूजा करताना मंदिराचा गाभारा विठुरायाच्या जयघोषात दुमदुमून गेला. यंदा मानाचे वारकरी म्हणून नवले दाम्पत्यांना मान मिळाला होता. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली. यावर्षी कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने राज्य सरकारने पंढरपूर वारीला परवानगी दिली होती. तब्बल दोन वर्षांनी वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला पाहण्यासाठी आतुर होते. त्यामुळे या वर्षी वारकऱ्यांचा उत्साह पाहण्याजोगा होता. सातसमुद्रापारही विठूरायाची महिमा पसरली आहे यावर्षी विदेशातील वारकरी देखील पंढरीला आले आहेत. आषाढीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा झाली आहे. त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, स्वत: एकनाथ शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि संभाजी शिंदेंचा पणतू अशा चार पिढ्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यंदा मानाचा वारकरी म्हणून मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना मान मिळाला.नवले दाम्पत्य हे मूळचे बीड जिल्ह्यातील रुई गावचे रहिवासी आहेत. गेल्या मुरली नवले व त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले या गेल्या वीस वर्षापासून पायी आषाढी वारी करतात. हे दाम्पत्य संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा सोबत पंढरपूरला पायी आले आहेत. यंदा मंदिर प्रशासनाने आषाढी एकादशीसाठी जय्यत तयारी केली आहे.संत ज्ञानेश्वर माऊली, रुक्मिणी पालखी, संत एकनाथ महाराज, संत सोपनकाका, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई आदी या मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत.