पुणे : आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण राज्यभरात जल्लोषा साजरी केला जात आहे. आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांनी देखील विठुरायाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर टीका केली. 'बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवला होता, त्याला दुखावणे म्हणजे बाळासाहेबांना दुखावण्यासारखं आहे', अशा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारला लगावला.
सुप्रिया सुळे यांनी आज, रविवारी आषाढी एकादशीनिमित्त पुण्यातील विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी विठ्ठलाचे आशीर्वाद अन् आभार मानण्यासाठी आल्याचे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शिंदे सरकार अस्थिर आहे, अजित दादा म्हणतोय ते खरं आहे. लोक सूरत, गुवाहाटी, गोवा फिरून आले. भारतदर्शन करून आले. बाहेरील राज्यातील पोलीस आपल्या आमदारांना हाताळत होते. हे दुर्दैवी आहे'.
'मुख्यमंत्री यांना पुढच्या २५ वर्षासाठी शुभेच्छा. शिवसेनेला मित्रपक्ष म्हणून साथ दिली आणि देत राहणार. बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवला होता, अर्थात उद्धव ठाकरे यांना दुखावणे म्हणजे बाळासाहेबांना दुखावण्यासारखं आहे. सरकार एका विमानातून उतरून दुसऱ्या विमानात बसतंय. फाइव्ह स्टारमध्ये अडीच हजाराची दाढी, कटिंग करतेय. त्यामुळे यात सर्वसामान्य, कष्टकरी शेतकरी मात्र भरडला जातोय. त्यामुळे यांना सर्वसामान्यांचं काही घेणं देणं नाही असे वाटतय . त्यामुळे हे असंवेदनशील शिंदे सरकार आहे'.