महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडी सुरु असतानाच पर्यावरणप्रेमींनी आरेचा मुद्दा उचलून धरला आहे. ‘मेट्रो कारशेड आरेतच होणार या भूमिकेवर महाराष्ट्रातले नवे सरकार ठाम आहे.राज्यसरकारच्या निर्णया विरोधात पर्यावरणप्रेमींनी ‘आरे वाचवा’ची हाक दिली आहे. तर दुसरीकडे अभिनेता सुमीत राघवन मात्र, आरे आंदोलकांच्या विरोधात आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ‘कारशेड वही बनेगा’ म्हणत ट्विट केले होते. यासगळ्यात आता त्याने पुन्हा एकदा ट्विट करत आरे आंदोलकांवर निशाणा साधला आहे.
सुमीतने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत “आंदोलकांनी नुसतं फलक घेऊन, झाडाला मिठी मारून प्रेम दाखवण्यापेक्षा जरा स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून पर्यावरणासाठी काहीतरी चांगलं करायला सांगा. समाजाचं आणि प्राण्यांचं भलं करा. आपलं योगदान करत महाराष्ट्र सरकारचा भार थोडा हलका करा, बरोबर?”, असे ट्वीट केले आहे.
पुढे सुमीतनं आणखी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये सुमीत म्हणाला, “कारशेड समर्थक देखील पर्यावरणाच्या विरोधात नाही, हे सत्य जाणून घ्या. तुम्हाला आणि तुमच्या पिढीला योग्य वाटेल ते सांगून काही खोटं पसरवू नका. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील संजय कांबळे यांना भेटा, म्हणजे कळेल.”