मुंबई: महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने हाहाकार मांडला होता. भारतीय हवामान खात्यानं या दोन्ही राज्यांसाठी अंदाज वर्तवला होता. की पुढील ३-४ दिवस पावसाचा जोर कमी राहील, त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे निर्माण झालेल्या संकटातून दिलासा मिळण्यासाठी मदत, सुविधा आणि वेळही मिळू शकणार आहे.
महाराष्ट्रात पाऊस आणि पुरामुळे १ जूनपासून आतापर्यंत १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरातमध्येही आतापर्यंत ९३ बळी गेले आहेत. दोन्ही राज्यांतील मृतांची आकडेवारी हि दोनशेच्या जवळपास आहे.भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. तर अन्य पाच राज्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरयाणा आणि जम्मू-काश्मीर, राजस्थानमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पाऊस पडेल असा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाने हिमाचल प्रदेशात १६ जुलै, राजस्थानमध्ये १७ जुलै, पंजाब आणि हरयाणात आजपासून १९ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर उत्तराखंडमध्ये १६ आणि १७ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे.छत्तीसगड, विदर्भ, मध्य प्रदेश, ओडिशा, गोवा, केरळ आणि कर्नाटकाच्या किनारपट्टी भागात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर १६ जुलै रोजी तामिळनाडू आणि कराइकल परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून गडचिरोली, भंडारा, पालघर, चंद्रपूर, रत्नागिरी, गोंदिया, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे आणि मुंबईत जोरदार पाऊस कोसळला. १ जूनपासून आतापर्यंत पाऊस, पूर, भूस्खलन, वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये १०२ जणांचा बळी गेला आहे. १८३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. राज्यात १४ एनडीआरएफ आणि पाच एसडीआरएफ पथकांकडून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.