कोल्हापूर : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यातच आता शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना 'जय महाराष्ट्र' करण्याचा निर्णय घेतल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.मंडलिकांनी आज, रविवारी हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका साखर कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्त्यांचा मेळावा बोलविलाय. यामध्ये ते तशी भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा वाद सध्या महाराष्ट्रात सुरूय. याच दरम्यान आता वेगवेगळ्या भागातील शिवसैनिक आता शिंदे गटात जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कोल्हापुरातही आता शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खासदार संजय मंडलिक शिंदे गटासोबत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.संजय मंडलिकांनी मातोश्रीपासून काहीसा दुरावा ठेवल्याची चर्चा रंगलीय. कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर मंडलिक दिल्लीत निर्णय जाहीर करणार असल्यानं आता शिवसेनेत धाकधूक आहे, तर मंडलिक नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्याबाबतीत संशयाचे दाट धुके निर्माण झाले असून, मातोश्रीवरील बैठकीत त्यांनी दोन्ही काँग्रेसची संगत सोडा, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळं तेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मंडलिक यांचा फोन बंद असल्यानं संपर्क होऊ शकला नाही. तर त्यांच्या स्वीय सहायकांनी मात्र वृत्तपत्रांनी लगेच काही अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया दिलीय.