छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन बंपरला धडकली. एरवी कोणतीही ट्रेन स्थानकात थांबल्यावरही बंपर आणि ट्रेन यांच्यात बरेच अंतर असते. मात्र, मंगळवारी सकाळी फलाट क्रमांक १ वरून ट्रेन मागे घेत असताना अचानक अपघात घडला. सिग्नल दिल्यानंतर ट्रेन पुढे जाण्याऐवजी मागे गेली. त्यामुळे लोकल ट्रेन थेट बंपरवर जाऊन आदळली. यामुळे ट्रेनचे दोन डबे रुळांवरून खाली घसरून एका बाजूला कलंडले गेले. ट्रेन रूळावरून घसरल्यानंतर काही डबे प्लॅटफॉर्मला धडकले. यामुळे प्लॅटफॉर्मवरच्या काही लाद्याही तुटल्या. या अपघातामुळे सीएसएमटी-पनवेल हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे. सध्या हार्बर रेल्वेमार्गावरील एकाच बाजूची वाहतूक सुरु आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे
हा अपघात नेमका कसा झाला, याची कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सध्या लोकल ट्रेन रुळावर आणून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. सीएसएमटी स्थानकात हार्बर रेल्वेसाठी दोन फलाट आहेत. त्यातल्या एका प्लॅटफॉर्मवर अपघात झाल्यानं एकच प्लॅटफॉर्म वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. मात्र, या सगळ्या गोंधळामुळे सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळेत हार्बर रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत असल्याने प्रवाशांनी मध्य रेल्वेमार्गाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.
ट्रेनचा खोळंबा झाल्याने प्रवासी ट्रॅकवर उतरले
हार्बर रेल्वेमार्गावरील या खोळंब्यामुळे गाड्यांचे वेळापत्रक संपूर्णपणे बिघडले आहे. सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे या इतर गाड्यांना सीएसएमटी स्थानकात प्रवेश करता येणे शक्य नाही. परिणामी एका ट्रॅकवरील सर्व गाड्या जागच्या जागी ठप्प झाल्या आहेत. टिळकनगर ते कुर्ला दरम्यान ट्रेन रखडल्याने लोक ट्रॅकवरून चालत निघाले आहेत. ऐन घाईगर्दीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने प्रवाशांना सध्या प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.