पुणे : प्रसिद्ध उद्योगपती आणि पुण्यातले बिल्डर डी.एस.कुलकर्णी यांना आणखी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. डीएसके यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. माहितीनुसार मुख्य प्रकरणामध्ये त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे डीएसके यांची लवकरच तुरूंगातून सुटका होण्याची शक्यता आहे.काही दिवसांपूर्वी डीएसके यांना मोफा प्रकरणात पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यातच आता सुप्रीम कोर्टाने मुख्य प्रकरणात त्यांना आज जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची जामीनासाठी धावपळ सुरू होती. ती धावपळ आता कुठेतरी संपताना दिसतेय. दरम्यान, हा जामीन मंजूर झाला असला तरी अजून चार प्रकरणांमध्ये डीएसके यांना जामीन मिळणं बाकी आहे.
हे प्रकरण नेमकं काय आहे?
ग्राहकांकडून अनामत रक्कम घेवून त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही, अशा आरोपाखाली डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेतली आणि त्यांना फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.दरम्यान, ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य गुन्ह्यातील आरोपी डीएसके आणि इतर आरोपी १७ फेब्रुवारी २०१८ पासून तुरुंगात आहेत. डीसके यांना जामीन मिळावा यासाठी त्यांचे वकील आशुतोष श्रीवास्तव आणि वकील रितेश येवलेकर यांनी अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने डीएसके यांच्या वकीलांची बाजून ऐकून घेतल्यानंतर आता त्यांना जामीन मंजूर केला आहे.