मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी ईडी पथक दाखल झालं आहे. यामुळे आता राऊतांच्या अडचणी वाढल्या आहेत. पत्राचाळ प्रकरणात 1039 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्राचाळ परिसरातील 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळमधील तीन हजार फ्लॅट बांधकाम करून 672 फ्लॅट भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. मात्र 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले.
या प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ईडीने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएलमधून 100 कोटी वळवण्यात आल्याचं समोर आलं. 2010 मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील 55 लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. वर्षा राऊत या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत. वर्षा यांनी ही रक्कम दादरमधील फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केला.
दरम्यान ईडीचं पथक संजय राऊत यांच्या घरी दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. शिवसेनेचं चिन्हाचा फोटो शेअर करत संजय राऊत यांनी म्हटलं की, तरीही शिवसेना सोडणार नाही.