पुणे : आंबिल ओढय़ाच्या साफसफाईची कामे संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुराच्या धोक्यामुळे या परिसरातील नागरिकांची जीव टांगणीला लागला असतानाच प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा फटका नागरिकांना बसला आहे. आंबिल ओढय़ाची साफसफाई आणि ओढय़ालगत सीमाभिंतीचे काम करताना ठेकेदाराच्या चुकीमुळे इंदिरा गांधी वसाहत परिसरातील घरांना तडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांकडून तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी महापालिकेने रहिवाशांची घरे धोकादयक ठरवून त्यांना घरे मोकळी करण्याची नोटिस बजाविली आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर आंबिल ओढय़ाच्या साफसफाईची कामे वेगात सुरू झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत असला, तरी आंबिल ओढय़ातील कामे अर्धवटच करण्यात आल्याचे वास्तव पुढे आले आहे. आंबिल ओढय़ातील राडारोडा पात्रात तसाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आंबिल ओढय़ालगतच्या वसाहती आणि सोसायटय़ांना धोका निर्माण झाला आहे. पडलेल्या, खचलेल्या सीमाभिंतीची बांधकामे न के ल्यामुळे यंदाही पावसाळ्यात वसाहतींमध्ये ओढय़ाचे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आंबिल ओढय़ालगत असलेल्या इंदिरा गांधी वसाहत आणि ओढा या दरम्यान असलेल्या सीमाभिंती उभारण्याचे कामही महापालिके कडून पावसाळ्यात सुरू करण्यात आले आहे. तसेच ओढय़ाच्या साफसाईची कामे सुरू करण्यात आली आहेत.
ही वसाहत १२० कु टुंबांची असून आंबिल ओढय़ालगत ४० घरे आहेत. यातील काही घरांना गेल्या दोन वर्षांपासून पुराचा तडाखा बसला होता. त्यापैकी ११ घरांना प्रत्येकी पाच हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात आली होती. यानंतर या भागातील रहिवाशांनी एकत्र येत कृती समिती स्थापन के ली.
त्या अंतर्गत सीमाभिंत बांधण्यासाठी महापालिका आणि स्थानिक नगरसेवकांकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार सीमाभिंतीचे काम जेसीबीच्या साहाय्याने करताना काही घरांना तडे गेल्याचे पुढे आले आहे. त्याबात समितीने महापालिका आयुक्तांकडे तक्रार नोंदविली होती. मात्र ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी महापालिकेने रहिवाशांची घरे धोकादायक ठरविली आहे. पावसाळ्यात दुर्घटना होऊ नये म्हणून घरे तातडीने खाली करावीत, अशी नोटिस महापालिकेने रहिवाशांना बजाविली आहे.
नागरिकांच्या तक्रारीनंतर महाापलिकेच्या कसबा-विश्रामबाग वाडा सहायक आयुक्त कार्यालयाकडून वसाहतीमधील बावन चाळ परिसराची पाहणी करण्यात आली. महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाकडून येथे सीमाभिंत बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यातील संभाव्य दुघर्टना टाळण्यासाठी नागरिकांना घरे खाली करण्याची नोटिस बजाविण्यात आली आहे. सिंहगड रस्त्यावरील रावसाहेब पटवर्धन विद्यालय येथील तळमजल्यावर रहिवाशांनी स्थलांतरित व्हावे, असे या नोटिसमध्ये म्हटले आहे. दरम्यान परिसरातील काही नागरिकांनी नोटिस नाकारल्या आहेत, अशी माहिती स्थानिक रहिवाशी दीपक वाघमारे यांनी दिली.