निखील मेस्त्री
पालघर : करोनाकाळात महसूल विभाग कामात व्यस्त असल्याचा फायदा उचलत रेतीमाफियांकडून वैतरणा नदीपात्रात मोठय़ा अवैध रेती उत्खनन सुरू केले आहे. दररोज सक्शन पंपाद्वारे हजारो ब्रास रेती उत्खनन केली जात असून त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. या उत्खननामुळे वैतरणा नदीवरील रेल्वे पुलासह इतर पुलांना मोठा धोका निर्माण झाला आहे. तरीही महसूल, पोलीस प्रशासनाचे या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे.
वैतरणा नदीच्या परिघात व तटावर अवैध रेती उत्खननामुळे नदीपात्र वाढले आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नदीत गेल्या आहेत. इतकेच नव्हे तर पारगाव पूल, वैतरणा पूल व आता वरई पूल या उत्खननामुळे धोक्यात आले आहेत. वैतरणा पुलाच्या आजूबाजूच्या परिसरात तर नौकानयनाला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वारंवार बंदी घातली जाते. मात्र त्यानंतरही नदी पात्रात रेती उत्खनन सुरूच आहे. यामुळे वैतरणा पुलाला मोठा धोका असून तो कधीही कोसळण्याची शक्यता असल्याचे रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले होते. अलीकडे रेती चोरी मोठय़ा प्रमाणात फोफावली होती. त्यावेळी महसूल व पोलीस प्रशासनाने विविध ठिकाणी कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले होते. नदी पत्रातून रेती उपसा करणारे पंप व बोटी उद्ध्वस्त केल्या होत्या. तरी उपसा काही थांबलेला नाही. महसूल व पोलीस प्रशासनाला कारवाया करताना काही तांत्रिक मर्यादा येत आहेत. मनुष्यबळ कमी असल्याने प्रत्येक ठिकाणी लक्ष देणे अवघड होऊन बसले आहे, अशी परिस्थिती सांगितली जाते. नदी पात्रात कारवाई करण्यासाठी मुबलक साधने उपलब्ध नाहीत त्यामुळे अशा कारवाया करताना महसूल व पोलीस प्रशासनासमोर पेचप्रसंग उभा राहतो. याचा फायदा घेत रेती चोरी करणाऱ्या बोटी नदी पात्रातून फरार होतात. ही रेती उपसा थोपविण्यासाठी शासनाने जिल्ह्यच्या महसूल यंत्रणेला सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी मनुष्यबळ, मुबलक तांत्रिक यंत्रणा आदी बाबीची पूर्तता केल्यास ही रेती उपसा नक्कीच थांबेल, असे सांगितले जात आहे.
शेतजमिनींना धोका
रेती उत्खनन यामुळे नदीपात्र खोलगट झाले आहे. त्यामुळे समुद्राचे खारे पाणी नदीपात्रात दूरवर येत आहे. त्यामुळे नदीलगतच्या शेतजमिनींना धोका उदभवत आहे, तर काही गावांमध्ये जलस्रोतही खारे झाल्याचे तेथील नागरिक सांगत आहेत.
शेतकऱ्यांचा संताप
वैतरणा नदी पात्राच्या परिघातील पारगाव, दारशेत, घाटीम, सोनावे, लालठाणे, तांदूळवाडी, विश्रामपूर, बहाडोली, खानिवडे, नारंगी, कोपरी, शिरगाव या ठिकाणच्या नदीपात्रात मोठय़ा प्रमाणात रेतीचे बेकायदा उत्खनन होत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी यामुळे नदीपात्रात जाऊ लागल्याने प्रशासनावर संताप व्यक्त होत आहे.
तक्रार निवारण कक्षाची स्थापना
जिल्ह्यत बेकायदा गौण खनिज, अवैध रेती/वाळू वाहतूक व उत्खनन केल्याचे आढळून आल्यानंतर तसेच अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी तक्रार निवारण केंद्राची स्थापना केली आहे. बेकायदा उत्खनन व वाहतुकीशी संबंधित कोणतीही तक्रार असल्यास ०२५२५—२९७४७४ किंवा ९३५९८५५५९७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असेही प्रशासनाने म्हटले आहे.
महसूल विभाग व पोलीस प्रशासन संयुक्तरीत्या अशा बेकायदा उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करतच आहे. मात्र काही जण नदीपात्रातून रेती चोरी करून पळ काढतात. अशा वेळी कारवाई करणे अडचणीचे ठरत आहे. यासाठी सक्षम यंत्रणा व मनुष्यबळ आवश्यक आहे.
-पालघर