पालघर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जुन्या पालघर मासळी बाजाराचा प्रश्न अखेर सुटण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. पालघर नगर परिषदेमार्फत बहुमजली बाजार उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. इमारत उभी राहिल्यास शहरातील सर्व मासळी विक्रेत्यांना त्यात सामावून घेण्यात येणार आहे. या बाजारामुळे ग्राहकांनाही एकाच ठिकाणी मासळी मिळण्याची सोय होणार आहे.
पालघर नगर परिषद हद्दीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मासळी विक्रीचा प्रश्न गंभीर बनला होता. मासळी विक्री महिलांकडून वारंवार विक्रीसाठीची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगर परिषदेकडे करण्यात येत होत होती. जुन्या पालघर येथे नगर परिषदेच्या मालकीचे मासळी बाजार व जमीन असल्यामुळे त्या ठिकाणी मासळी बाजार प्रस्तावित करण्यात आला. मात्र मासळी बाजारासमोर असलेल्या रस्त्याचे आरक्षण चुकीच्या पद्धतीने टाकल्यामुळे मासळी बाजाराच्या उभारणीला पूर्णविराम बसला होता. नगर रचना विभागाने मासळी बाजाराच्या प्रस्तावाला रस्ता रुंदीकरण होत असल्याने बाजार इमारत उभारणे शक्य नसल्याचे कारण देत स्थगिती दिली होती. तसेच या रस्त्याच्या दुतर्फा खासगी जमिनी असल्याने त्याही बाधित होणार होत्या. विकास आराखडय़ात या रस्त्याचे आरक्षण एकतर्फी असल्यामुळे नगर परिषदेने सभेमध्ये हे एकतर्फी आरक्षण रद्द करावे असा ठरावही घेतला आहे.
मासळी बाजाराच्या रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजू समांतर रुंदीकरण केलेला ठराव योग्य असल्याचे न्यायालयाने सांगितल्यामुळे या मासळी बाजाराच्या अडचणी दूर झाल्या असल्याचे नगर परिषदेचे गटनेते कैलास म्हात्रे यांनी म्हटले आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार व नगर परिषदेच्या ठरावानुसार मासळी बाजाराचा बहुमजली इमारत नकाशा तांत्रिक मंजुरीसाठी नगर रचना विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. यासाठी नगर परिषदेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नगररचना विभागाने या नकाशाच्या तांत्रिक प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर बहुमजली इमारतीच्या अंदाजपत्रकाचे काम नगर परिषदेमार्फत सुरू होईल. त्यानंतर या अंदाजपत्रकाच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवण्यात येईल. तेथे हा प्रस्ताव मान्य झाल्यास प्रशासकीय मान्यता व त्यासाठीच्या निधीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मासळी बाजाराच्या उभारणीचा मार्ग मोकळा होणार असल्यामुळे मासळी विक्रेत्या महिलांना दिलासा मिळणार आहे.